पिंपरी : जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवस संप केल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे. दोन दिवसानंतर महापालिकेचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले आहे. पेन्शनच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. पण, काळ्या फिती लावून कामकाज सुरू केल्याचे कर्मचारी महासंघाच्या पदाधिकऱ्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुनी पेन्शन योजना लागू करावी. प्रदीर्घ काळ कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांना समान वेतन देऊन सेवेत नियमित करावे. महापालिकेतील रिक्त पदे भरावीत, अशा विविध मागण्यांसाठी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मंगळवारी मागण्यांबाबत तोडगा निघाला नसल्याने बुधवारीही बेमुदत संप सुरू होता. जुनी पेन्शन लागू असलेले कर्मचारीही संपात सहभागी झाले होते. दोन दिवस संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिका, क्षेत्रीय कार्यालये पूर्णपणे बंद होती. महापालिकेचे कामकाज ठप्प झाले होते.

हेही वाचा – पुणे पोलिसांचा मॉर्निंग वॉक; टेकड्या, उद्यानांच्या परिसरात गस्त आणि नागरिकांशी संवाद

हेही वाचा – पिंपरीतील कुख्यात गुंड बाळा वाघेरेला खंडणी आणि मारहाण प्रकरणी अटक

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी महापालिका सेवेत रुजू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावे. विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याबाबत आदेश द्यावेत. कामावर रुजू न झाल्यास शिस्तभंग कारवाईस पात्र राहतील, असा इशारा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडली. २००५ पूर्वीच्या जुनी पेन्शन लागू असलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याची भूमिका घेतली. त्यानुसार सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आजपासून कामकाज सुरू केले. कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे. दोन दिवसानंतर महापालिकेचे कामकाज पूर्वपदावर आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad mnc employees strike called off pune print news ggy 03 ssb