पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथे घराच्या छतावरील मोबाईल टॉवर कंपन्यांनी मिळकत कर न भरल्याने कर संकलन विभागाने कारवाई केली आहे. ‘टाटा टेली सर्व्हिसेस’सह जीपीएलच्या मोबाईल टॉवरना सील ठोकले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कर संकलन विभागाने कर बुडवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडमधील विविध ठिकाणी कर संकलन विभागाने कारवाई केली होती. त्यात झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तींनी तब्बल एक ते दीड कोटींचा कर धनादेश स्वरूपात भरला होता. त्याचप्रमाणे आज दुपारीही कर संकलन विभागाने निगडी प्राधिकरण येथील सेक्टर नंबर २४, २६ आणि २७ या ठिकाणी घरांवरील पाच मोबाईल टॉवरवर कारवाई केली. या टॉवरना सील ठोकले आहे. यात जीपीएलचे पाच, तर टाटा टेली सर्व्हिसेसच्या एका टॉवरचा समावेश आहे. या सर्वांचा मिळून तब्बल २० ते २६ लाख मिळकत कर थकला होता. त्यामुळे आज कारवाई करून टॉवरला सील ठोकण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोबाईल टॉवर कंपन्या कराची थकीत रक्कम भरणार नाहीत, तोपर्यंत या मोबाईल टॉवरचे सील काढण्यात येणार नाही. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात असणाऱ्या टॉवरची थकीत रक्कम ही अंदाजे १० ते १५ कोटी असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी संदीप खोत यांनी दिली.
सहआयुक्त दिलीप गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप खोत, सहायक मंडळ अधिकारी प्रमोद काशीकर, महेंद्र चौधरी, अनिल मुरलीधर शिंदे, कृष्णा पाटील यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad mobile towers sealed