ठेकेदारांचा सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनावर डोळा असता कामा नये, प्रत्येक कामगाराला त्यांच्या कामानुसार हक्काचे पैसे मिळालेच पाहिजेत, अशी तंबी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. सुशिक्षित माणसेही रस्त्यांवर, गर्दीच्या ठिकाणी कचरा करताना दिसतात. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. स्वच्छता ही केवळ पालिकेची जबाबदारी नसून शहरातील सर्वच घटकांचा यात सहभाग आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पुणे: फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी २४ कोटी मंजूर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत स्वच्छताविषयक काम करणारे पाच हजार सफाई सेवक आहेत. त्या अंतर्गत अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत आयुक्त बोलत होते. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात झालेल्या या कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपायुक्त अजय चारठाणकर, समन्वयक विनोद जळक, सहायक आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सोनम देशमुख आदींसह मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा >>>पिंपरीः स्वच्छताविषयक कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, इंदूर शहराचे स्वच्छताविषयक काम अतिशय चांगले आहे. त्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरातील सध्याची स्थिती चांगली आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, पिंपरी-चिंचवड शहर देशातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्वच्छता ही केवळ पालिकेची जबाबदारी नसून शहरातील सर्वच घटकांचा यात सहभाग आवश्यक आहे, असे आयुक्त म्हणाले.
हेही वाचा >>>पुण्यात सीएनजीची दरवाढ; एक रुपयांनी महाग, सीएनजी ९२ रुपये किलो
जितेंद्र वाघ म्हणाले, स्वच्छताविषयक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतानाच नावीन्यपूर्ण उपक्रमही राबवले पाहिजेत. स्वच्छतेसाठी काम करणारे पालिकेचे थेट कर्मचारी; तसेच कंत्राटी कामगारांनाही शासकीय योजनांचे लाभ मिळाले पाहिजेत.