पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहराला सध्या दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे शहरात दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहणार आहे,’ असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवडला २५ नाेव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पण, ज्या दिवशी पाणी येणार असते, त्याही दिवशी शहरातील अनेक भागांत अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्यातच आता उन्हाळा वाढताच शहरातील सर्वच भागांतून पाण्याच्या माेठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या आहेत. जनसंवाद सभेतही या तक्रारी आल्या. त्या संदर्भात पत्रकारांशी बोलताना, त्यांनी पाणीपुरवठ्याविषयी माहिती दिली.
‘सध्या दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नाही. शहरामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. ‘एमआयडीसी’कडून २० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा होत आहे. पूर्वी तो ३० एमएलडी होता. तर, आंद्रा धरणातून ८० एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. जलसंपदा विभागाची ७३ कोटी रुपयांची पाणीपट्टी भरण्यात आली आहे. अद्याप ६० कोटी रुपये बाकी असून, त्याबाबत निर्णय व्हायचा आहे. जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणी देताना औद्योगिक दर आकारला आहे. पाण्याचे अन्य स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. मुळशी धरणासह इतर दोन ठिकाणांहून पाणी घेण्यासाठी बैठक झाली आहे. जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार पाण्याचे लेखापरीक्षण करण्याची तयारी आहे,’ असे सिंह यांनी स्पष्ट केले.
‘भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. भूसंपादन पूर्ण झाले आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी संपूर्ण भूसंपादन करण्याची आवश्यकता नाही. कारण, जमिनीखालून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्या जागेवर शेतकरी शेती करू शकतात. त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरासाठी डिसेंबरअखेर किंवा २०२६ च्या सुरुवातीला अतिरिक्त पाणी मिळेल,’ असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.
पाणीपुरवठा तीन एप्रिलला बंद
जलशुद्धीकरण केंद्र आणि क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा व विद्युतविषयक दुरुस्तीची विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे तीन एप्रिल रोजी सकाळचा पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार होणार आहे. तर, संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवल्यामुळे चार एप्रिल रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.