पिंपरी : नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी आणि विकासकामांची अंमलबजावणी करण्यासाठी झाडांचे पुनर्रोपण किंवा वृक्षतोड करण्याशिवाय पर्याय नसतो, असे सांगत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वृक्षतोडीचे समर्थन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने ‘रानजाई महोत्सव’ व २७ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन’ व स्पर्धेचे आयोजन महापौर निवास निगडी प्राधिकरण येथील मोकळ्या मैदानात १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवाला भेट दिल्यानंतर आयुक्त सिंह बोलत होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, उपायुक्त रविकिरण घोडके यावेळी उपस्थित होते. पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाला अडथळा ठरणारी संरक्षण खात्याच्या जागेवरील १४२ झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे.

हेही वाचा…पुणे : पिस्तूल बाळगणारा तडीपार गुंड अटकेत

या पार्श्वभूमीवर बोलताना आयुक्त सिंह म्हणाले, देशातील सर्वात पर्यावरणपूरक शहरांमधील एक पिंपरी-चिंचवड शहर आहे. नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी आणि विकासकामांची अंमलबजावणी करण्यासाठी बऱ्याचवेळा झाडांचे पुनर्रोपण किंवा वृक्षतोड करण्याशिवाय पर्याय नसतो. वृक्षतोड केल्यानंतर पाचपट किंवा दहापट वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. महापालिका याची पूर्णपणे काळजी घेत आहे. शहरात विविध ठिकाणी हजारोंच्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात असून त्यात प्रामुख्याने देशी झाडांची लागवड केली जात आहे. शहरातील वातावरण पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी तळवडे येथे महापालिकेच्या वतीने जैवविविधता उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. ५० एकरमध्ये उभारण्यात येणाऱ्या या पार्कमुळे शहराला एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. नागरिकांना पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal commissioner supports tree felling for development works but also said important of replantation tree pune print news ggy 03 psg