पिंपरी : पावसाला सुरुवात झाली, तरी पिंपरी-चिंचवड शहरातील नालेसफाई पूर्ण झाली नसल्याने आयुक्त शेखर सिंह यांनी नालेसफाईची पाहणी केली. नालेसफाईला गती देऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
शहरातील विविध भागांतील नाल्यांची, तसेच पाणी साचणाऱ्या संभाव्य ठिकाणांची आयुक्तांनी पाहणी केली. तसेच, पावसाळ्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन आजूबाजूच्या घरांमध्ये नाल्याचे पाणी जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी. सातत्याने स्थळपाहणी करून पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होईल आणि रस्ते जलमय होणार नाहीत याची काळजी घ्यावी, तसेच सांडपाणी वाहिनी व पाणीपुरवठा विभागाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही आयुक्त सिंह यांनी दिल्या. आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी या वेळी उपस्थित होते. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत २५ नाले, ‘ब’ १५, ‘क’ २९ , ‘ड’ १२, ‘ई’ १६, ‘फ’ १८, ‘ग’ ९ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २० असे एकूण १४४ नाले महापालिका हद्दीमध्ये आहेत.
चिंचवड, आकुर्डी रुग्णालय, निगडी उड्डाणपूल, माता अमृतानंदमयी शाळा, राधा स्वामी सत्संग भवन, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी उड्डाणपूल, धावडे वस्तीकडील उतार, पीसीएमसी चौक, आदिनाथनगर, आदिनाथ सोसायटीजवळील महामार्गाचा भाग येथील नाल्यांची, तसेच संभाव्य पाणी साचणाऱ्या भागांची आयुक्तांनी पाहणी केली.