लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : शहरातील चिंचवड, आकुर्डी, चिखली भागांत रविवारी पाऊण तासात कोसळलेल्या ११४.५ मिली मीटर पावसाने सर्वत्र पाणी साचल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाई ही शंभर टक्के झाली असल्याचा महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे आता यापुढील पावसात पाणी तुंबण्याच्या घटना घडल्यास जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रभारी आयुक्त राहुल महिवाल यांनी दिला आहे.

शहरात झालेल्या पावसात आनंदनगर, निगडी ओटास्कीम, विद्यानगर, दत्तनगर, शंकरनगर, शाहूनगर, मोरेवस्ती आदी भागांमधील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तर, चिखलीतील घरकुल योजनेच्या परिसरात सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. स्पाईन रोड जाधववाडी परिसरात सोमवारी सायंकाळीही पाणी रस्त्यावर तसेच होते. पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचल्याने महापालिकेच्या कामावर पाणी पडले.

आणखी वाचा-पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील पीडित परिवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाई ही शंभर टक्के झाली असून सांडपाणी वाहिन्या आणि पावसाळी गटारांची स्वच्छता केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र, हा दावा किती फोल होता याची प्रचिती रविवारी झालेल्या पहिल्याच पावसात आली. शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर, तसेच सखल भागामध्ये तळेसदृश पाणी साचले होते. आनंदनगर परिसरात सांडपाणी वाहिनीत कचरा अडकल्याने सांडपाणी आणि पावसाचे पाणी नागरिकांच्या झोपड्यांमध्ये शिरले. त्यामुळे त्यांचे साठवलेले धान्याचे नुकसान झाले. आनंदनगरमध्ये ऐन पावसाळ्यात सांडपाणी वाहिनीचे काम सुरू होते. या परिसरात नालेसफाई झाली नाही, असा आरोप नागरिकांनी केला.

सांडपाणी वाहिन्यांतील पाणी पावसाच्या पाण्यात मिसळून घराघरांत गेल्याची परिस्थिती दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर आदी भागांत पाहावयास मिळाली. निगडी ओटास्कीम येथील झोपड्यांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. चिखलीतील महापालिकेच्या घरकुल योजनेच्या परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पहिल्याच पावसात तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेदेखील कठीण झाले होते. शहरातील झोपड्यांमध्ये शिरलेले पाणी लक्षात घेता महापालिकेने पावसाळापूर्वी कोणतेही काम व्यवस्थित केले नसल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा-संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी, येत्या शुक्रवारी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान

ज्या भागात पाऊस झाला, त्याभागात संपूर्ण नालेसफाई झाली होती. कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने नालेही ओसंडून वाहत होते. काही सांडपाणी वाहिन्या आणि पावसाळी गटारांमध्ये प्लॅस्टिक, कचरा अडकल्याने पाणी तुंबले. पाऊस थांबल्यानंतर एक ते दीड तासात संपूर्ण पाणी वाहून गेल्याचा दावा आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी केला.

पाणी तुंबल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. सर्व प्रभागातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. सांडपाणी वाहिन्या आणि पावसाळी गटारांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यास सांगितले आहे. यापुढील पावसात पाणी तुंबण्याच्या घटना घडल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल. -राहुल महिवाल, प्रभारी आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका