पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१३-१४ या आर्थिक वर्षांतील अंदाजपत्रकास नऊ तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतरही पालिका सभेची मंजुरी मिळू शकली नाही. सर्वपक्षीय सदस्यांनी उपसूचनांचा अक्षरश: पाऊस पाडला असून त्याची छाननी केल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडणार आहे. अंदाजपत्रकावरील उर्वरित चर्चा शुक्रवारी (२२ मार्च) होणार असल्याने मंजुरीही त्याच दिवशी मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेचे ३२४८ कोटींचे अंदाजपत्रक सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. दुपारी दोन वाजता सुरू झालेली सभा रात्री साडेअकरापर्यंत सुरू होती. त्या चर्चेत जवळपास ४७ नगरसेवकांनी सहभाग घेतला. बहुतांश सदस्यांनी उपसूचना मांडल्या आहेत. त्याचे गौडबंगाल आजही उमगले नाही. किती उपसूचना सादर झाल्या, त्याविषयी प्रशासनाकडे ठोस माहिती उपलब्ध नव्हती. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली उपसूचना स्वीकारण्याचे व फेटाळण्याचे काम दरवर्षी केले जाते, त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याचे बोलले जाते.
या संदर्भात, नगरसचिव दिलीप चाकणकर यांनी सांगितले की, अंदाजपत्रकास अद्याप मान्यता मिळालेली नाही. सभेत दाखल झालेल्या उपसूचनांची छाननी करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सुसंगत पध्दतीने उपसूचना मांडण्यात आल्या आहेत का, याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी पालिका सभेत उर्वरित कामकाज होईल व अंदाजपत्रकास मंजुरी मिळू शकेल, असे ते म्हणाले.नवे क्रीडा धोरण व अतिरिक्त आयुक्ताची पदनिर्मिती
महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सभेत ऐनवेळी क्रीडा धोरणाच्या मंजुरीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, महापालिकेला आवश्यक असलेल्या दुसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदाची निर्मिती करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. या दोन्ही विषयांवर शुक्रवारी चर्चा व निर्णय होणे अपेक्षित आहे.

Story img Loader