‘गावकी-भावकी’ आणि नात्यागोत्याचे राजकारण

‘दहा गावं दुसरी, एक गाव भोसरी’, अशी ख्याती असलेल्या भोसरी गावात महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने गावकी-भावकी आणि नात्यागोत्याचेच राजकारण राहणार असून वर्चस्व दाखवून देण्यासाठी आमदार महेश लांडगे व माजी आमदार विलास लांडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

इंद्रायणीनगरचा काही भाग वगळता संपूर्ण भोसरी गाव प्रभाग क्रमांक ५, ६ व ७ या तीन प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहे. पाचमध्ये गवळीनगर, रामनगर, तुकारामनगर, गंगोत्री पार्क, सावंतनगर, महादेवनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, चक्रपाणी वसाहतीचा काही भाग असून सर्वसाधारण, ओबीसी, सर्वसाधारण महिला (दोन जागा) असे आरक्षण आहे. सहामध्ये धावडे वस्ती, भगतवस्ती, गुळवे वस्ती, चक्रपाणी वसाहतीचा काही भाग, पांडवनगर, रोशल गार्डन परिसर, सद्गुरूनगर आदी भाग असून सर्वसाधारण (दोन जागा), ओबीसी महिला व अनुसूचित महिला असे आरक्षण आहे. सातमध्ये शीतलबाग, आपटे कॉलनी, सँडविक कॉलनी, खंडोबामाळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतिनगर आदी भाग समाविष्ट असून सर्वसाधारण महिला (दोन जागा), सर्वसाधारण व ओबीसी असे आरक्षण आहे.

शहरावर प्रभाव असणाऱ्या भोसरीच्या राजकारणावर सुरुवातीपासून स्थानिकांचे वर्चस्व आहे. लांडगे, लांडे, फुगे, गव्हाणे, िशदे, लोंढे, गवळी, पठारे, माने अशी येथील घराण्यांची मोठी यादी आहे. ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे यांनी आतापर्यंत भोसरीकरांचे नेतृत्व केले. सध्या आमदार महेश लांडगे यांच्याकडे धुरा आहे. २००२ मध्ये विलास लांडे व अंकुश लांडगे यांच्या पक्षविरहित युतीने राष्ट्रवादीचे भोसरीतील सर्व उमेदवार पराभूत केले होते. २००७ च्या निवडणुकीपूर्वी भाजपचे वारे होते. मात्र, अंकुश लांडगे यांचा खून झाला व त्यानंतर शहरात भाजपची वाताहात झाली. तरीही भोसरीत भाजपच्या तीन जागा निवडून आल्या होत्या. २०१२ मध्ये लांडे यांच्याच प्रभावाने पुन्हा भोसरी ‘राष्ट्रवादीमय’ झाली. ‘लक्ष्य २०१७’ ला सामोरे जाताना महेश लांडगे यांच्यासह राष्ट्रवादीचे काही नगरसेवक भाजपमध्ये गेले. राष्ट्रवादीला िखडार पडले, भाजपचे वारे वाहू लागले.

भोसरी भाजपमध्ये महेश लांडगे यांचा शब्द अंतिम राहील. राष्ट्रवादीच्या गोटात विलास लांडे, अजित गव्हाणे यांच्या शब्दाला वजन राहणार आहे. ‘सर्वाचे हित, फक्त अजित’ ही प्रचाराची नवी ओळ बोलकी आहे. भोसरीत शिवसेनेची पूर्वापार छुपी ताकद आहेच. भाजपशी युती होणे अथवा न होणे, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. खुल्या गटातील पुरुष व महिलांच्या जागांचे प्रमाण भोसरीत जास्त असले, तरी इच्छुकांची संख्याही अधिक आहे. त्यात बहुतांश मंडळी एकमेकांच्या नात्यात आहे. त्यामुळे होणाऱ्या लढती भावकी-गावकीत होणार आहेत. त्यामुळे पक्ष हा घटक महत्त्वाचा नसून नात्यातील व्यक्ती महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिकांच्या वादात बाहेरील व्यक्ती निवडून आल्याची यापूर्वीची उदाहरणे आहेत. मात्र, नेतृत्व म्हणून कोणीही विकसित होऊ शकले नाही. प्रस्थापितांसह नव्या-जुन्या चेहऱ्यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी भोसरीतील निवडणूक रंगतदार होणार आहे. त्याची झलक आतापासूनच दिसू लागली आहे.