पिंपरी : वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, या उद्देशाने शासनाचे पर्यावरणपूरक विद्युत वाहने खरेदीचे धोरण असले, तरी पिंपरी-चिंचवड शहरात चार्जिंग स्थानकांचा अभाव आहे. पालिकेने २२ चार्जिंग स्थानके उभारणार असल्याचे जाहीर केले. परंतु, दोन वर्षांनंतरही ही स्थानके कागदावरच आहेत. शहरात आजमितीला ४३ हजार विजेवरील वाहने असल्याची पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद आहे. विजेवरील वाहनांचा वापर वाढावा यासाठी पालिकेने शहरात २२ ठिकाणी खासगी संस्थेद्वारे चार्जिंग स्थानके उभारण्याचे नियोजन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वत: बांधा आणि संचालित करा या तत्त्वावर स्थानके उभारली जाणार आहेत. यासाठी पालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. संबंधित संस्थेला जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जागेवर आठ वर्षांकरिता स्वत:च्या खर्चाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा घेणे, चार्जिंग स्थानक उभारणे आणि चालन व देखभाल करणे या बाबी संस्थेने करणे आवश्यक आहे. मात्र दोन वर्षे पालिकेच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. अटी-शर्ती बदलत तीन वेळा नव्याने निविदा प्रसिद्ध करावी लागली. परिणामी, पालिकेची चार्जिंग स्थानके कागदावरच आहेत. वाहनांच्या चार्जिंगसाठी स्थानके नसल्याने विजेवरील वाहने खरेदी करण्याकडील कल कमी होताना दिसत आहे.

हेही वाचा : निवडणुकीमुळे उत्तरेकडील रेल्वे गाड्यांत गर्दीचा महापूर! तिकीट विक्री बंद करण्याची रेल्वेवर वेळ

स्थानकांसाठी २२ ठिकाणे निश्चित

पालिका मुख्य प्रशासकीय इमारतीचे प्रांगण, पिंपरीतील सिट्रस हॉटेलजवळ, दुर्गादेवी टेकडी, वाहतूकनगरी (निगडी), मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडिअम नेहरुनगर, कोकणे चौक पिंपळे सौदागर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चिखली, बर्ड व्हॅली संभाजीनगर, कुस्ती संकुल भोसरी, मलनि:सारण केंद्र चिखली, लांडेवाडी भोसरी, भक्ती-शक्ती निगडी, बजाज ऑटोजवळ, संत तुकारामनगर मेट्रो स्थानक, पी. के. चौक, योगा पार्क- पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान-पिंपळे गुरव, संतनगर उद्यान कासारवाडी, बी. डी. किल्लेदार उद्यान, वल्लभनगर, ऑटो क्लस्टर आणि राजर्षी शाहू उद्यान अशा २२ ठिकाणच्या जागा चार्जिंग स्थानकासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल

चार्जिंग स्थानकांच्या निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तीन वेळा निविदा प्रसिद्ध करावी लागल्याने विलंब झाला. आता तीन ठेकेदार आले आहेत. पात्र-अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation electric vehicle charging stations at 22 places in city pune print news ggy 03 css