लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील आरेखक संजीवनी मोरे यांचा मुलगा शिवराज यांनी वयाच्या २२ व्या वर्षी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती मिळविली. सैन्यदलात रूजू होण्यापूर्वी शिवराज यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली.

शिवराज मोरे हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन येथील रहिवासी आहेत. ते नवी सांगवी येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे शालेय शिक्षण औंध येथील केंद्रीय विद्यालयात झाले. त्यांचे वडील प्रदीप मोरे हे क्रीडा अधिकारी असल्यामुळे त्यांना अभ्यासाबरोबरच खेळाचे मार्गदर्शनही घरातून मिळाले. शालेय जीवनात लॉन टेनिस या खेळात शिवराज यांनी सहा वेळा राष्ट्रीय पातळीवर प्राविण्य मिळाले आहे. त्यांनी बारावीनंतर ‘टेक्निकल एंट्री स्ट्रीम’द्वारे होणारी परीक्षा बंगलोर येथून दिली. त्यामध्ये ते पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण बिहारमधील अकादमीतून घेतले आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी तेलंगणा येथील सिकंदराबाद येथील सैन्य दलाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झाले आहेत. शिवराज यांना प्रशिक्षणादरम्यान सुवर्णपदकांसह विविध पुरस्कार मिळालेले असून त्यांना सैन्यदल प्रमुखांच्या उपस्थितीत लेफ्टनंट पदवी मिळालेली आहे.

आणखी वाचा-झोपडपट्टीतील युवकांना कौशल्यानुसार रोजगार; काय आहे उपक्रम…

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुले-मुली शिक्षण, कला, संशोधन, क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. त्यांच्यामुळे शहराच्या नावलौकीकातही भर पडत असून त्यांचा गौरव करताना अभिमान वाटतो’.

Story img Loader