पिंपरी : महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मूर्ती, निर्माल्य संकलनाकरिता फुलांनी सजवलेले सुशोभीकरण रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्रभागांमध्ये मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध असणार आहेत. नागरिकांनी आणि मंडळांनी गणेशमूर्ती दान कराव्यात, असे आवाहन महापालिकेने केले. घरगुती गणपतीचे विसर्जन नागरिकांनी शक्यतो घरी करण्यास व मूर्तिदान करण्यास प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांनी गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन मंडपालगत कृत्रिम हौदामध्ये करण्यास प्राधान्य द्यावे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामार्फत मूर्ती आणि निर्माल्य संकलनाकरिता फुलांनी सजवलेले सुशोभीकरण रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी, मंडळांनी गणेशमूर्तीं दान कराव्यात. महापालिकेद्वारे संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे विधिवत आणि पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
महापालिकेने शहरातील सर्व विसर्जन घाटांवर भाविकांसाठी सुरक्षा, आरोग्य, आपत्तीच्या सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मोशीतील इंद्रायणी नदी विसर्जन घाट, रावेत येथील जाधव विसर्जन घाट, थेरगाव चिंचवड पूल विसर्जन घाट, चिंचवड येथील सुभाष घाट, पिंपळे गुरव येथील पुण्यश्लोक अहल्यादेवी घाट, सांगवी येथील वेताळमहाराज घाट, वाकड गावठाण येथील विसर्जन घाट, वैभवनगर, पिंपरी येथील कृत्रिम विसर्जन घाट सज्ज आहेत.
हेही वाचा : पुणे : ‘यूजीसी’कडून १९ अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन, दूरस्थ पद्धतीने प्रवेशास मनाई
घाटांवर दिशादर्शक व स्थळदर्शक फलक, निर्माल्यकुंड, जीवनरक्षक, अग्निशामक यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवली जाणार आहे. तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी. विसर्जन घाटांवर सुशोभीकरण करण्यात यावे, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
हेही वाचा : अतिक्रमण विरोधी पथकातील सहायक निरीक्षकाला कानाखाली मारली; बेकायदा पथारी लावणाऱ्या महिलेवर गुन्हा
विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक
शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सफाई कामगारांचा पथकात समावेश आहे. ‘नागरिकांनी मूर्तिदान करावे. गणेशमूर्तींचे विधिवत, पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येणार आहे’, असे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले आहे.