पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी तयार केलेल्या ‘ई-ऑफिस’ या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात मंगळवारपासून (१ एप्रिल) झाली. त्यामुळे महापालिकेचे कामकाज कागदविरहित होणार आहे. कागदपत्रे डिजिटल स्वरूपात जतन केली जाणार आहेत.
महापालिका प्रशासनाच्या वतीने एक जानेवारी २०२५ पासून डिजिटल कारभार सुरू करण्यात येणार होता. मात्र, काही कारणास्तव ती त्या वेळी सुरू न होता, त्याऐवजी २६ जानेवारी ही तारीख देण्यात आली. मात्र, त्याही वेळी ही प्रणाली सुरू होऊ शकली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सहा फेब्रुवारीला या डिजिटल कारभाराचे उद्घाटन झाले. त्यामुळे महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये फेब्रुवारी महिन्यात डिजिटल कामकाज सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे पुन्हा यामध्ये व्यत्यय आला. आता मात्र डिजिटल कामकाज सुरू झाले आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने जीआयएस एनेबल्ड ईआरपी प्रकल्पांतर्गत ३३ संगणक प्रणाली विकसित केल्या आहेत. यासाठी ११२ कोटींचा खर्च झाला आहे.
कागदपत्रे डिजिटल स्वरूपात
महापालिकेत प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणावर नस्तीचा ढीग आहे. शासनाच्या शंभर दिवसांच्या उपक्रमामध्ये या नस्ती तपासून त्यावर कार्यवाही करण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. यापुढे कागदपत्रे डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येणार आहेत. कागदविरहित कारभार सुरू व्हावा, तसेच नवीन तंत्रज्ञानानुसार डिजिटल प्रणालीचा वापर करण्यासाठी ‘ई-ऑफिस’ ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच, विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, प्रशासन अधिकारी, शाखा प्रमुख, लिपिक यांना प्रशासकीय कामकाजासाठी डिजिटल कोड देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या सर्व विभागांत ‘ई-ऑफिस’ प्रणालीद्वारे कामकाज सुरू झाले आहे. यापुढे एकही नस्ती ‘ऑफलाइन’ स्वीकारली जाणार नाही. महापालिकेने नवीन तंत्रज्ञानाकडे टाकलेले हे एक पाऊल आहे. ‘ई-ऑफिस’ कामकाजामुळे कागदविरहित कामकाज होऊन प्रशासकीय कामकाज सुलभ होईल. शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका