लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत ४४७ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी पहिल्या तीन महिन्यांत कराचा भरणा केला आहे.
शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा सहा लाख दोन हजार २०३ नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे. विभागाने राबविलेले विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटिसा, नळजोड बंद करणे, थकबाकीदारांच्या नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून देयकांचे घरपोच वाटप, रिक्षाद्वारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात जाहिरात फलक, रिल्स स्पर्धा, समाज माध्यमाचा प्रभावी वापर केला. यामुळे २०२३-२४ च्या अवघ्या पहिल्या तिमाहीतच ४४७ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.
आणखी वाचा-पिंपरी महापालिकेचे वराती मागून घोडे; कचरा सेवा शुल्कातून ३५ कोटी वसूल केल्यानंतर प्रशासन म्हणते…
सहा लाख मालमत्ता धारकांपैकी तीन लाख तीन हजार ३५० मालमत्ता धारकांनी म्हणजे पन्नास टक्के मालमत्ताधारकांनी तीन महिन्यांत कराचा भरणा केला आहे. या मालमत्ता धारकांनी ४४७ कोटी तीन लाख ९६ हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला. ३० जून रोजी एकाच दिवशी १४ हजार ६२० नागरिकांनी ३० कोटी ८५ लाख रुपयांचा भरणा केला. पुढील नऊ महिन्यांत ५० टक्के मालमत्ता धारकांकडून कर संकलन करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाणार आहे. थकीत असलेला कर वसूल आणि चालू कर १०० टक्के वसुली करणे हे विभागाचे ध्येय असल्याचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले.
वाकड, सांगवी, चिंचवड, थेरगावमध्ये कर भरणाऱ्यांची संख्या अधिक
कर भरण्यात निवासी मालमत्ता धारकांची आघाडी आहे. दोन लाख ६८ हजार निवासी मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. वाकड झोनमध्ये सर्वाधिक ३९ हजार ६००, सांगवीमध्ये ३४ हजार ६९४, चिंचवडमध्ये २९ हजार ३०३, थेरगावमध्ये २८ हजार ३६८ मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. सर्वात कमी तळवडे झोनमध्ये चार हजार १३१ मालमत्ता धारकांनी कर भरला आहे.
नावीन्यपूर्ण कल्पना आणि उपक्रमामुळे पहिल्या तीन महिन्यांतच ५० टक्के मालमत्ताधारकांनी कर भरला. जप्तीसारख्या अप्रिय कारवाया केल्या असल्या. तरी त्यामागे शहराच्या विकासाचे सूत्र आहे. -प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका