पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे. या कक्षांतर्गत उद्योजक आणि महापालिका यांच्यातील समन्वय राखला जाणार आहे. या कक्षाद्वारे औद्योगिक अडचणींचे निराकरण, संवाद आणि सुविधा सुलभ करण्यावर भर दिला जाणार आहे.

महापालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या उद्योग सुविधा कक्षाबद्दल माहिती देण्यासाठी उद्योजकांसमवेत महापालिकेत बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, उद्योग सुविधा कक्षाचे संचालक विजय वावरे, सीएसआर सल्लागार श्रुतिका मुंगी आणि शहरातील उद्योजक या वेळी उपस्थित होते.

याबाबत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, ‘औद्योगिक गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, स्थानिक व्यापारी, उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद वाढवणे, गुंतवणूकदारांना कायदेशीर व प्रशासकीय सहकार्य पुरवणे, ही या कक्षाची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. तसेच ‘उद्योग सुविधा कक्ष’ आणि ‘उद्योग सारथी’ संकेतस्थळाच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम केली जात आहे.’

‘या संकेतस्थळावरून उद्योजकांना परवाने, मंजुरी आणि इतर शासकीय सुविधा एका क्लिकवर मिळतील. तसेच थेट संवादामुळे त्यांच्या समस्या जलदगतीने सोडवता येतील. उद्योग सुविधा कक्षात नियमित संवाद बैठका आयोजित करण्यात येतील. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत मासिक बैठकांद्वारे स्थानिक प्रश्नांवर चर्चा व उपाय, आयुक्तस्तरीय त्रैमासिक बैठकांद्वारे धोरणात्मक संवाद तसेच सीएसआर उपक्रम, कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण व सामाजिक विकास यांची माहिती देणारी सेवा पुरविण्यात येणार आहे,’ असे ते म्हणाले.