पिंपरी-चिंचवड महापालिका मंगळवारी (११ ऑक्टोबर) ४० वर्षे पूर्ण करत आहे. स्थापनेनंतर पहिली चार वर्षे पालिकेवर प्रशासक होता. ४० वर्षांच्या प्रवासानंतर पालिकेवर पुन्हा प्रशासकीय राजवट आहे. चार मोठ्या गावांचे एकत्रीकरण करून स्थापन झालेल्या पिंपरी नगरपालिकेचे अवघ्या १२ वर्षांत महापालिकेत रूपांतर झाले. अतिशय वेगाने विकसित झालेल्या शहराची आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.तत्कालीन खासदार अण्णासाहेब मगर यांच्या पुढाकाराने ४ मार्च १९७० ला नगरपालिका स्थापन झाली. त्यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि आकुर्डी या ग्रामपंचायतीचे एकत्रीकरण झाले. त्यानंतर, ११ ऑक्टोबर १९८२ ला नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्यात आले. तेव्हापासून सुरू झालेला पिंपरी पालिकेचा २०२२ पर्यंतचा प्रवास अनेक चढ-उतारांचा तसेच नाट्यमय घडामोडींचा आहे.
हेही वाचा >>>पुणे : सिंहगड रस्त्याच्या पर्यायी मार्गाला पोलिसांचा अडसर ; महापालिका-वाहतूक पोलिसांमध्ये वाद , रस्त्याचा वापर नाही
स्थापनेनंतर पहिल्या चार वर्षांत प्रशासकीय राजवट होती. हरनामसिंह हे प्रशासक होते. त्यांच्या काळात झालेली वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन याचे दाखले आजही दिले जातात. पालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९८६ मध्ये झाली. तेव्हा सदस्यसंख्या ६० होती. पालिकेची सत्ता काँग्रेसने मिळवली. पहिला महापौर होण्याचा मान काँग्रेसच्या ज्ञानेश्वर लांडगे यांना मिळाला. तेव्हा पालिकेचा कारभार रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदशर्नाखाली होत होता. त्यांच्या दूरदृष्टीतून शहरात भरीव विकासकामे झाली. पुढे, अजित पवार यांचा शहराच्या राजकारण उदय झाला. १९९९ पर्यंत महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. शहर काँग्रेसमध्ये फूट पडून मोठा गट राष्ट्रवादीत सहभागी झाला. २००२ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या जवळपास समान होती. त्यामुळे अजित पवार व रामकृष्ण मोरे यांनी दोन्ही काँग्रेसची आघाडी करून पालिका ताब्यात घेतली. २००७ व २०१२ च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती पालिकेची सत्ता मिळवली. मोदी लाटेचा परिणाम म्हणून २०१७ मध्ये पिंपरी पालिका भाजपने ताब्यात घेतली. सत्ता कोणाकडे असो, शहराचा विकास वेगाने होत राहिला.
हेही वाचा >>>पुणे जिल्ह्यात २० जणांना नव्याने करोना संसर्ग
एकीकडे शहराचा कायापालट होत असताना अनेक समस्या वर्षानुवर्षे कायम आहेत. शहरात पाण्याची तीव्र समस्या असून पाणीकपात लादली आहे. पाणी नियोजनात पालिका अपयशी ठरली आहे. प्रस्तावित पाणीयोजना वादात आहेत. कचऱ्याची समस्या सुटलेली नाही. निविदांचा घोळ व संगनमताने लूट सुरू आहे. ‘स्मार्ट सिटी’, ‘अमृत योजने’त गैरव्य़वहारांची मालिका आहे. स्मार्ट सिटीच्या कारभारात गौडबंगाल आहे. रेडझोनचा व बेकायदेशीर बांधकामांचा प्रश्न सुटलेला नाही. शाळांचा दर्जा घसरलेला आहे. आरोग्य आणि वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडालेला आहे, अशी समस्यांची यादी बरीच मोठी आहे.
वर्ष लोकसंख्या
१९८१ – २ लाख ४९ हजार
१९९१ – ५ लाख १७ हजार
२००१ – १० लाख ६ हजार
२०११ – १७ लाख २९ हजार
२०२२ – २७ लाख (अंदाजे)
हेही वाचा >>>निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला मशाल चिन्ह; पुण्यात शिवसैनिकांकडून मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा
पिंपरी-चिंचवड हे झपाट्याने विकसित झालेले शहर आहे. आर्थिक समृद्धी, प्रशस्त रस्ते, जागेची उपलब्धता आदींमुळे गेल्या चार दशकांत शहराचा कायापालट झाला. गावचे गावपण, ग्रामीण संस्कृती जपतानाच शहराने आधुनिकतेची कास धरली आहे. पुण्यापेक्षा अधिक गतीने वाढणारे पिंपरी-चिंचवड हे सर्व सुविधांयुक्त महानगर बनले आहे.- श्रीकांत चौगुले, पिंपरी-चिंचवडचे अभ्यासक
गावांपासून सुरू झालेली पिंपरी-चिंचवडची वाटचाल जागतिक शहर होण्याकडे सुरू आहे. राहणीयोग्य पसंतीचे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. पायभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली प्रगती शहराला स्मार्ट सिटी अशी ओळख निर्माण करून देते. उद्योगनगरीप्रमाणेच ‘आयटी हब’ म्हणून शहराने वेगळे स्थान निर्माण केले आहे. मुख्य व अंतर्गत भागातील प्रशस्त रस्ते हे शहराचे वैशिष्ट मानले जाते.– अण्णा बोदडे, सहायक आयुक्त, पिंपरी पालिका