पिंपरी : शहरातील हाेर्डिंगधारकांना दरवर्षी परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक असताना नूतनीकरणास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. परवाना नूतनीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या १०० हाेर्डिंगधारकांना नाेटिसा देण्यात आल्या आहेत. ३१ मार्चपूर्वी नूतनीकरण न केल्यास संबंधित हाेर्डिंग अनधिकृत समजून कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

महापालिकेची परवानगी न घेतला लावलेल्या हाेर्डिंगवर कारवाई करून हाेर्डिंगधारकांवर महापालिका प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील किवळे येथे १७ एप्रिल २०२३ रोजी अनधिकृत हाेर्डिंग काेसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला हाेता. या दुघर्टनेनंतर महापालिकेने शहरातील १७४ अनधिकृत हाेर्डिंग जमीनदाेस्त केले. शहरात सद्य:स्थितीत सुमारे एक हजार ४०० हाेर्डिंग अधिकृत असल्याचा दावा आकाशचिन्ह व परवाना विभागाने केला आहे. किवळे दुर्घटनेनंतर प्रशासनाने हाेर्डिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असली तरी हाेर्डिंगधारकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

शहरात अधिकृत असलेल्या एक हजार ४०० हाेर्डिंगधारकांपैकी शंभर हाेर्डिंगधारकांनी चालू आर्थिक वर्षासाठीच्या परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे या हाेर्डिंगधारकांना आकाशचिन्ह व परवाना विभागाने नाेटिस दिल्या आहेत. नोटीस मिळताच शंभरपैकी ४० हाेर्डिंगधारकांनी परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. मात्र, अद्याप ६० जणांनी अर्ज केलेले नाहीत. हाेर्डिंगधारकांनी ३१ मार्चपूर्वी परवान्याचे नूतनीकरण करून घ्यावे, अन्यथा हाेर्डिंग अनधिकृत समजून कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

थकबाकी असणाऱ्या हाेर्डिंगधारकांनाही नाेटिसा

आकाशचिन्ह व परवाना विभागाला चालू आर्थिक वर्षात १८ काेटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत १६ काेटी ६७ लाख रुपयांचे उत्पन्न महापालिकेच्या तिजाेरीत जमा झाले आहे. १५ हाेर्डिंगधारकांकडे दीड लाख ते पाच लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यांनाही नाेटिसा देण्यात आल्या आहेत.

परवाना नूतनीकरण न केलेल्या शंभर हाेर्डिंगधारकांना नाेटिसा दिल्या हाेत्या. त्यापैकी ४० हाेर्डिंगधारकांनी परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. ३१ मार्चपूर्वी परवान्याचे नूतनीकरण न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनी दिला आहे.

Story img Loader