पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील अनधिकृत भंगार गोदामांसह लघुउद्योगांवर कारवाई केल्यानंतर आता महापालिकेचे ६० काेटी रूपयांचे नुकसान झाल्याचे समाेर आले आहे. या भागात अनधिकृत व्यवसाय असले तरी काही व्यावसायिक मालमत्ता कर दरवर्षी भरत हाेते. त्यामुळे या व्यावसायिकांकडून महापालिका तिजोरीत चालू आर्थिक वर्षात जमा होऊ शकणारा ६० कोटी रुपयांचा मालमत्ता कर बुडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेने चिखली कुदळवाडीत ८ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. एक हजार एकर परिसरातील तीन हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे, पत्राशेड महापालिकेने जमीनदोस्त केली आहेत. महापालिकेने कारवाई केलेल्या अनधिकृत बांधकामांपैकी काही बांधकामांची महापालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागाकडे नोंद आहे. त्यांच्याकडून अनेक वर्षांपासून महापालिका मालमत्ता कर वसूल करते. चालू आर्थिक वर्षात येथील काही मालमताधारकांनी कराचा भरणा केला होता. मात्र, येथे झालेल्या सरसकट कारवाईत अनेक मालमत्ता महापालिकेने पाडल्या. त्यांच्याकडून अंदाजे ६० कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा होणे अपेक्षित होते.

या परिसरातील अनेक मालमत्ताधारकांनी थकबाकीची रक्कम भरण्यासाठी धनादेश करसंकलन विभागाकडे जमा केले आहेत. त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर हा मिळकत कर वसूल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हे धनादेश आता करसंकलन विभागात पडून आहेत.

दरम्यान, कुदळवाडी येथे सलग नऊ दिवस कारवाई करण्यात आली. याठिकाणी असलेले अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामे या कारवाईमध्ये निष्कासित करण्यात आले. नियोजित विकास आरक्षणे आणि नागरी सुविधा जागेवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमेतून चिखली – कुदळवाडी येथे निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामेही पाडण्यात येणार आहेत. तळवडे, काळेवाडी, थेरगाव, पिंपरी, वाल्हेकरवाडीतही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.