पिंपरी : महापालिकेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सात हजार कोटींचे अंदाजपत्रक असणार आहे. चालू वर्ष निवडणुकांचे असून लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ, दरवाढ होणार नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेच्या लेखा विभागाच्या वतीने अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेच्या विविध ५२ विभागांना माहिती देण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी सूचना केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेने ई-बजेट सादर करण्याचे धोरण स्वीकारले आहे. ही माहिती विविध विभागप्रमुखांच्या संगणक प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. प्रत्येक विभागाने प्रणालीमध्ये भरलेली माहिती लेखा विभागाकडे जमा होईल. त्यामधून लेखा विभाग पुढील कार्यवाही करणार आहे.

हेही वाचा…पिंपरीत ३ पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद; दरोडा विरोधी पथकाची कारवाई

महापालिकेचे यंदाचे सुमारे सात हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक डिजिटल प्रणालीने तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पुढील महिन्यात अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. लेखा विभागाच्या वतीने विविध विभागांच्या बैठका सुरू आहेत. त्यामध्ये विभागाच्या वतीने संगणक प्रणालीवर देण्यात आलेल्या माहितीची खातरजमा केली जात आहे. नागरिकांनाही दहा लाख रुपयांपर्यंतची कामे सुचवण्यास सांगितले होते. त्यातील योग्य कामांचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा…पिंपरी : ‘एसटीपी’वर लक्ष ठेवण्यासाठी खासगी सल्लागार नेमण्यास गृहनिर्माण संस्थाधारकांचा विरोध, निर्णय रद्द करा, अन्यथा…

प्रशासकीय राजवटीतील दुसरे अंदाजपत्रक

महापालिकेत दि. १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. सन २०२३-२४ चे अंदाजपत्रक आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनीच सादर केले होते. यंदाचे अंदाजपत्रकही आयुक्तच सादर करणार असून, प्रशासकीय राजवटीमधील दुसरे अंदाजपत्रक असणार आहे. त्यामुळे आयुक्तांच्या पोतडीतून शहरवासीयांना काय मिळणार याची उत्सुकता असणार आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन म्हणाले की, अंदाजपत्रकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. विभागाचा आढावा घेतला जात आहे. पुढील महिन्यामध्ये आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीमध्ये अंदाजपत्रक सादर करतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation not going to increase tax rates ahead of elections pune print news ggy 03 psg
Show comments