बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर भाजप प्रेमावरून होणाऱ्या टीकेमुळे भलतेच अडचणीत सापडले. शरद पवार, अजित पवार यांनी आतापर्यंत त्यांच्या तालावर नाचणारे आयुक्त पिंपरी महापालिकेला दिले. तीच परंपरा सत्तातरानंतर भाजपने पुढे चालवली आहे. हर्डीकर यांच्यावर भाजपचे प्रवक्ते, एजंट असे अनेक आरोप सातत्याने होत आहेत. यात भाजपविरोधकांचे राजकारण आहेच. आयुक्तांची सत्ताधाऱ्यांशी असणारी जवळीक आणि भाजपला फायदेशीर ठरणारी त्यांची भूमिकाही कारणीभूत आहे.

पिंपरी महापालिकेचे आयुक्त असणे आणि त्यांची सत्ताधारी पक्षाशी जवळीक असणे, हे जुनेच समीकरण आहे. आयुक्तांची सत्ताधारी नेत्यांशी असणारी निष्ठा हा नेहमी कळीचा मुद्दा राहिला आहे. पिंपरी महापालिकेवर आतापर्यंत शरद पवार, अजित पवार यांची निर्विवाद सत्ता होती. या काळात ‘पवार बोले आणि महापालिका डोले’ अशाच पद्धतीचा कारभार वर्षांनुवर्षे चालला. श्रीनिवास पाटील यांच्यापासून ते राजीव जाधव यांच्यापर्यंतच्या अनेक  आयुक्तांचीनावे सत्ताधाऱ्यांबरोबर जोडली गेली. पवारांच्या मर्जीनेच त्यांनी कारभाराचा गाडा हाकला. तीच परंपरा महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतरही कायम राहिली आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर ‘नागपूर कनेक्शन’ असलेल्या श्रावण हर्डीकर यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. स्थानिक नेत्यांच्या हाती सत्ता एकवटल्यानंतर त्यांच्याकडून मनमानी कारभार होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यावर देखरेख ठेवणे, शक्य झाल्यास नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी जवळीक असलेल्या हर्डीकर यांची निवड करण्यामागे दुसरा हेतू होता. पिंपरीत आल्यापासून हर्डीकर यांच्यावर भाजपधार्जिणे असा आरोप सुरू झाला, तो अजूनही होत आहे. आयुक्तांच्या भाजपप्रेमाचे तसेच भाजपनेते अडचणीत आल्यानंतर त्यांचा बचाव करण्याच्या कार्यपद्धतीचे अनेक दाखले दिले जातात.

गेल्या आठवडय़ात पिंपरीत आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवरून हर्डीकर यांना मोठय़ा टीकेला सामोरे जावे लागले. राजशिष्टाचार म्हणून आयुक्त त्यांच्या भेटीसाठी गेले. मात्र, त्यांची जागा चुकली. ते पालकमंत्र्यांना भाजप कार्यालयात जाऊन भेटले.  तेथेच त्यांच्याशी चर्चा केली. यावरून भाजप विरोधकांचे राजकारण सुरू झाले. नगरसेवक मयूर कलाटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. त्यांनी आयुक्त कार्यालयाला भाजप कार्यालय आणि आयुक्तांच्या पाटीवर भाजप प्रवक्ते अशा पाटय़ा लावल्या. स्थायी समितीतही आयुक्तांना जाब विचारण्यात आला. काँग्रेस, एमएआयएम, भारिप बहुजन महासंघ या पक्षांनी आयुक्तांचा निषेध करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. पक्ष कार्यालयात येऊन आम्हालाही मार्गदर्शन करा, असे आमंत्रण देत राष्ट्रवादीने आयुक्तांच्या गळ्यात भाजपचे उपरणे असणारा फोटो समाजमाध्यमावर प्रसारित केला. ही भेट राजशिष्टाचाराचा भाग होती. त्या दिवशी पालकमंत्र्यांचा कार्यक्रम फक्त भाजप कार्यालयात होता, त्यामुळे तेथे जाऊन भेटलो, असा खुलासा आयुक्तांनी केला. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर भाजपला खिंडीत पकडण्यासाठी भाजपविरोधक एकत्र आले होते. विरोधकांकडे असणारे इतर मुद्दे प्रभावी ठरत नव्हते. त्यामुळे त्यांनी आयुक्तांना लक्ष्य केले.

केवळ दिखाऊपणामुळे मूळ समस्या तशाच

पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह विभागीय रुग्णालयांशी संबंधित प्रश्नांसाठी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी यांनी बैठक घेतली. महापौर राहुल जाधव यांना डावलून झालेल्या या बैठकीत नेहमीची तीच चर्चा, तेच आवाहन आणि तेच इशारे देण्यात आले. स्थायी समितीचे स्वारस्य असणारे खरेदीचे विषयही चर्चेत होतेच.  नियमितपणे रुग्णालयात येणाऱ्या कोणाही नागरिकाला येथील प्रश्न तथा समस्यांची पुरेपूर माहिती आहे. याचे कारण वर्षांनुवर्षे त्या समस्या सुटलेल्या नाहीत.

सत्ताधारी नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांना सर्व काही माहिती असूनही त्याचा काहीही उपयोग नाही. यावर ठोस उपाययोजना त्यांच्याकडून कधी झाली नाही. रुग्णहिताचा विचार न करता स्वहिताचा विचार करणारे धोरणकर्ते आणि कायम वेळकाढूपणा करण्यातच धन्यता मानणारी प्रशासकीय व्यवस्था असल्यानंतर दुसरे काय होणार? रुग्णालयात होणारी गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येऊ लागल्याने रुग्णालयाचे व्यवस्थापन ढासळले आहे. केसपेपर काढणे, तपासण्या करणे, औषधांचा पुरवठा अशा प्रत्येक ठिकाणी लांब रांगा आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांना थांबण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांनी कुठेही आसरा घेतल्याचे चित्र दिसते.

अपुरे मनुष्यबळ ही बाराही महिने भेडसावणारी समस्या आहे. शिकाऊ डॉक्टरांचा भरणा अधिक आहे. त्यांच्याच जिवावर रुग्णालयाचा डोलारा उभा आहे. तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची कमतरता आहे. त्याचा परिणाम अनेकदा दिसून आला आहे. डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याचे सर्वाधिक प्रकार चव्हाण रुग्णालयात झाले आहेत. त्याची कारणे शोधण्याचा किंवा हे प्रकार रोखण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याचा प्रयत्न झालेला नाही. रुग्णालयात येऊन चर्चा, बैठका, दौरे करणारे सत्ताधारी आले आणि स्वहित साधून निघून गेले. येथील मूळ प्रश्न मात्र कायम राहिले आहेत.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation pcmc chief shravan hardikar zws