पिंपरी :महापालिकेच्या कर संकलन विभागाने मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी गेल्या आर्थिक वर्षात जप्तीपूर्व नोटीसा देत मालमत्ता लाखबंद (सील) करणे, नळजोड खंडित करण्यासह विविध उपाययोजना केल्यानंतरही शहरातील एक लाख ३० हजार ८०३ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नसल्याची बाब समोर आली आहे. या मालमत्ताधारकांकडे ४३५ काेटी रूपयांची थकबाकी आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख ५० हजार निवासी व बिगरनिवासी मालमत्ता असल्याची नोंद महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाकडे आहे. कर संकलन विभागाला गतवर्षी एक कोटींचे उद्दिष्ट दिले होते. यासाठी कर संकलन विभागाने थकीत व नियमित कर वसुलीसाठी जप्तीपूर्व नोटीसा देत जप्ती, नळजोड तोडण्याची कारवाई केली. दरमहा दोन टक्के दराने विलंब दंड आकारला जात हाेता. कर भरावा, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यानंतरही ३१ मार्चअखेर ९६६ कोटी रूपयांपर्यंत कर वसुली केली. एक लाख ३० हजार ८०३ मालमत्ता धारकांनी थकीत व मूळ कर भरला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

थकबाकीमध्ये सर्वाधिक एक लाख नऊ हजार ६०० निवासी मालमत्ता असून त्यांच्याकडे २६६ काेटी ८० लाखांची थकबाकी आहे. चालू आर्थिक वर्षांत या थकबाकीदारांकडे महापालिकेचे विशेष लक्ष असणार असून त्यांचा कर वसूल करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

थकबाकी असलेल्या मालमत्तांचे विवरण

मालमत्ता मालमत्ता संख्याथकीत रक्कम
औद्याेगिक७०११७ काेटी सात लाख
मिश्रतीन हजार ९३६२८ काेटी ४४ लाख
निवासीएक लाख ९, ६००२६६ काेटी ८० लाख
माेकळ्या जमीनचार हजार ६८७५० काेटी ५५ लाख
इतर२८४५८ लाख
बिगरनिवासी११ हजार ५९५७२ काेटी सात लाख
एकूण१,३०,८०३४३४ काेटी ५१ लाख

गेल्या आर्थिक वर्षात एक हजार ७२ मालमत्ता लाखबंद करण्यात आल्या. त्यापैकी ५१० मालमत्ता धारकांनी कर भरला आहे. ५६२ मालमत्ताधारकांनी अद्याप कराचा भरणा केला नाही. त्यामुळे या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. थकीत कर वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.