पिंपरी : नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या पहिल्याच लोकशाही दिनाला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. शहराची लोकसंख्या ३० लाख असताना पहिल्या लोकशाही दिनात केवळ दोन तक्रारी आल्या आहेत.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख, गतिमान प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपआयुक्त तथा समन्वय अधिकारी राजेश आगळे, कार्यकारी अभियंता एस.एन नरोटे, कार्यकारी अभियंता सुर्यकांत मोहिते, प्रशासन अधिकारी अधिकारी श्रद्धा बोर्डे, उपअभियंता विकास घारे, नरेश जाधव,कनिष्ट अभियंता संतोष जगदाळे, ए. एम. वाकोडे यावेळी उपस्थित होते.

लोकशाही दिनाच्या निमित्ताने नागरिक विविध नागरी समस्या, पायाभूत सुविधा, मालमत्ता कर, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आदी विषयांवर तक्रारी आणि सूचना प्रशासनासमोर मांडू शकतात. प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून या तक्रारींची दखल घेतात आणि त्वरित उपाययोजना केली जाते. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकशाही दिन प्रभावी माध्यम आहे. नागरिकांनी या लोकशाही दिन उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन इंदलकर यांनी केले आले. सोमवारी पार पडलेल्या पहिल्या लोकशाही दिन उपक्रमात दोन तक्रारी प्राप्त झाल्या.

अर्ज स्वीकृतीचे निकष

लोकशाही दिनासाठी दाखल करावयाच्या अर्जाच्या विहित नमुन्यातील प्रती नागरिकांना सहजतेने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज करताना यामध्ये नमूद तक्रारीवजा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असेल. हा अर्ज अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या नावे असावा. नागरी सुविधा केंद्रांचे विभागप्रमुख तथा समन्वय अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यातील अर्ज अर्जदाराने १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठवणे आवश्यक राहील. लोकशाही दिनाच्या दिवशी प्रत्यक्ष तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाही.

Story img Loader