पिंपरी : शहरामध्ये ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे, अशा मालमत्तेचे नळजोड तोडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून याबाबत नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे वेळोवेळी संदेशाद्वारे (एसएमएस) व इतर माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. परंतू, शहरातील नागरिकांचे आज रात्री नऊ वाजता नळजोड तोडण्यात येईल, असे येणारे संदेश फसवणुकीचे आहेत. याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज रात्री नऊ वाजता नळजोड तोडण्यात येईल, अशा आशयाचे देवेश जोशी, महापालिका अधिकारी या नावाने व ९३०९४४५८२४/ ९३२५८४८११५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनपर फसवणूक करणारा संदेश पाठविण्यात येत आहे. असे संदेश हे नागरिकांची फसवणूक करणारे असून याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

कोणतेही ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करु नका!

तुमच्या माहितीमध्ये बदल आहेत, तुम्ही माहिती बदल करण्यासाठी सदर ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठीचे संदेश तुमच्या व्हाट्सअपवरती येत आहेत. तरी त्याप्रकारच्या लिंक, ऍप्लिकेशन डाऊनलोड न करता त्याकडे दुर्लक्ष करावे. आपणास आपल्या माहितीबाबत, पाणीपट्टीबाबत कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास महापालिकेच्या ८८८८००६६६६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करसंकलन विभागाद्वारे करण्यात आले आहे.

महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून पाणीपट्टी वसुलीची मोहिम सुरु करण्यात आली आहे. नागरिकांना करसंकलन विभागाकडून थकीत पाणीपट्टी भरण्याचे अधिकृत क्रमांक व सिस्टिमवरुन संदेश पाठविण्यात येत आहेत. कोणत्याही मोबाईल क्रमाकांवरुन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात येत नाही. तरी नागरिकांनी अशा क्रमांकावरुन आलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करुन आर्थिक फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले.

शनिवारी करसंवाद

करदात्यांच्या शंकाचे निरसनासाठी करसंकलन विभागाने करसंवाद उपक्रम सुरू केला. नागरिकांच्या मालमत्ताकराबाबतच्या शंका, प्रश्नांचा निपटारा होण्यासाठी एक फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता करसंवादाचे ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात आयोजन केले आहे. नागरिक व अधिकारी यांच्यामध्ये थेटसंवाद असा उद्देश असलेल्या करसंवादामध्ये नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत विभागाकडून तत्काळ माहिती पुरविण्यात येईल. यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या यूट्यूब चॅनेल व समाजमाध्यमातील खात्यावरून आपले प्रश्न विचारून आपल्या शंकाचे तात्काळ निरसन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation says sms regarding disconnection of water supply is scam pune print news ggy 03 css