नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या ‘जैसे थे’ राहते. नागरिकांच्या या समस्यांना प्रातिनिधिक व्यासपीठ देऊन त्यांचे गाऱ्हाणे या व्यासपीठावर मांडणारा ‘लोकसत्ता’चा हा पुढाकार…एकीकडे शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शहरभर पाणी फवारणारी मोटार फिरवत असताना दुसरीकडे मात्र रस्ते साफ करणारे सफाई वाहन (रोड स्वीपर) धूळच धूळ उडवत असल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेमार्फत शहरातील १८ मीटर रुंदीचे रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफ केले जातात. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग केले आहेत. फेब्रुवारी २०२४ पासून यांत्रिकी पद्धतीने चार विभागांत काम सुरू असून, यासाठी चार संस्था कार्यरत आहेत. प्रत्येक विभागात दोन मोठी, दोन मध्यम रस्ते सफाई वाहने, दोन हायवा, एक पाण्याचा टँकर अशा वाहनांचा समावेश आहे. या वाहनांचे संचलन करण्यासाठी प्रत्येक विभागात ३२ सफाई कर्मचारी, नऊ वाहनचालक, दहा ऑपरेटर, चार मदतनीस अशा ५५ कामगारांद्वारे कामकाज केले जाते. प्रत्येक रस्तेसफाई वाहनाद्वारे दररोज ४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करणे आवश्यक आहे. १८ मीटर आणि त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते, बीआरटीएस, महामार्गावरील पदपथ आणि सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंची आठवड्यातून तीन वेळा, मुख्य मार्गावरील मधल्या रस्त्याची, रस्त्याकडेच्या भिंतीच्या परिसराची आठवड्यातून एक वेळ सफाई करण्यात येत आहे.

काय आहे नेमकी समस्या?

शहरातील १८ मीटर पुढील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफ केले जातात. परंतु, रस्ते साफ करणारे वाहनच मोठ्या प्रमाणात धूळ उडविते. या वाहनांकडून रस्ता व्यवस्थित साफ केला जात नाही. रस्ता साफ न करताच वाहन दामटले जात असल्याचे दिसून येते. शहरातील अनेक रस्त्यांवर सध्या खोदकाम सुरू आहे. तर, बहुतांश रस्ते हे खड्ड्यांमुळे खराब झालेले आहेत. अशा रस्त्यांवर ही यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

धूळ निर्माण होण्याची कारणे

रस्त्यांची व्यवस्थित सफाई न करणे

रस्त्यांची कामे व विकासकामे

शहरात सुरू असणारी बांधकामे

बांधकामासाठी उभारण्यात येणारे ‘आरएमसी’ प्रकल्प

शहरात फिरणारी ‘आरएमसी’ची वाहने

बांधकामाचा राडारोडा

खराब व खड्डे पडलेले रस्ते

नागरिकांचे म्हणणे काय?

शहरातील विविध भागांमधील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई केली जाते. रस्तेसफाई करताना धूळ कमी होणे आवश्यक आहे. परंतु, या वाहनांकडूनच जास्त धूळ उडते. कच्चे रस्ते, डागडुजी न केल्याने रस्त्यांवर पडलेले खड्डे, तसेच रस्त्याच्या बाजूला असणारे बांधकामाच्या वाळूचे व मातीचे ढीग अशी स्थिती असणाऱ्या रस्त्यांवर हे सफाई वाहन चालवले जाऊ शकत नाही. त्यामुळे आधी रस्ते दुरुस्त करावेत, असे इखलास सय्यद म्हणाले.

प्रशासनाचे म्हणणे काय?

रस्ता साफ करताना धूळ उडणार नाही याची काळजी घेतली जाते. रस्ता साफ न करताच वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी सांगितले.