पिंपरी : महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच जागी अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. त्यात ‘अ’ आणि ‘ब’ संवर्गातील ३४ अधिकारी तर ‘क’ मधील ३३२ कर्मचारी आणि तांत्रिक संवर्गातील ७१ असे ४३७ कर्मचारी हे बदलीसाठी पात्र झालेले आहेत. या ठाण मांडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ऑगस्टअखेरीस बदल्या करण्यात येणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका सेवेतील ‘अ’ ते ‘ड’ संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात २०१५ मध्ये धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार एप्रिल व मे महिन्यात बदल्या करणे अपेक्षित असते. मात्र, लोकसभा निवडणुका असल्याने कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांत कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक, सहायक भांडारपाल, लेखापाल, उपलेखापाल यासारख्या पदांवर अनेक वर्षे ठाण मांडून बसलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता धूसर होती. मात्र, आयुक्त शेखर सिंह यांनी ‘अ’ ते ‘ड’ संवर्गातील जे अधिकारी, कर्मचारी हे एप्रिल व मे २०२४ या महिन्यात बदलीस पात्र ठरत होते. त्यांची आणि ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक, वैद्यकीय कारणास्तव बदली पाहिजे अशा कर्मचाऱ्यांची माहिती मागविली होती. त्यानुसार विभागप्रमुखांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केली आहे.
हेही वाचा…पिंपरी : ध्वजारोहण सुरु असताना आयुक्त शेखर सिंह यांच्या मोटारीवर हल्ला; दिव्यांग व्यतीने फोडली काच
एकाच विभागात तीन वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे. त्यात स्थापत्य, विद्युत विभागाचे तीन कार्यकारी अभियंता, १४ उप अभियंता, दोन माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, दोन उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, तीन प्रशासन अधिकारी, एक लेखाधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी असे २९ वरिष्ठ अधिकारी बदलीस पात्र आहेत. तर, बदलीसाठी एक सह शहर अभियंता, चार उपअभियंता आणि एका सहायक आरोग्य अधिकारी अशा पाच अधिकाऱ्यांनी अर्ज सादर केला आहे. ‘क’ संवर्गातील ३३२ आणि तांत्रिक संवर्गातील ७१ कर्मचारी बदलीसाठी पात्र आहेत.
हेही वाचा…पुणे : स्वातंत्र्यदिनाची अनोखी भेट; गहाळ झालेले ५३ मोबाइल संच परत; तक्रारदारांना दिलासा
बदलीसाठी पात्र झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती आली आहे. ऑगस्टअखेर या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.