लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : कुटुंबकल्याण, मातृ व बालसंगोपन, नियमित लसीकरण आदी सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज्य कुटुंबकल्याण कार्यालयाने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. महापालिकेला ९२ गुण मिळाले आहेत.

यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासह महापालिकेची आठ मोठी रुग्णालये, ३० दवाखाने आहेत. आपला दवाखाना, जिजाऊ क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिल्या जात आहेत. वैद्यकीय विभागामार्फत आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी अनेक प्रभावी उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये मातृ व बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत गरोदर मातानोंदणी, बारा आठवड्यांपूर्वी प्रसूतिपूर्वनोंदणी, गरोदर मातांचे लसीकरण आणि ‘आयएफए’ गोळ्यांचे वितरण यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

तसेच बालआरोग्य सेवांच्या अंतर्गत नवजात बालकांची नोंदणी, नियमित लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांचे नियोजन, ‘पीपीआययूसीडी’ बसवण्याचे प्रमाण वाढवण्यावर भर, गरोदर महिलांसाठी उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्यावर भर आदी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या आधारावर १ एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंतचा आढावा घेऊन राज्य कुटुंबकल्याण कार्यालयाने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात पिंपरी महापालिकेने ९२ गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे.

वैद्यकीय विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सतत नव्या उपक्रमांची रचना आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले. भविष्यात ऑनलाइन आरोग्य व्यवस्थापन, आधुनिक आरोग्य केंद्रे आणि व्यापक लसीकरण कार्यक्रमांच्या माध्यमातून आरोग्यसेवा आणखी बळकट करण्याचा प्रयत्न असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

Story img Loader