काय चाललंय प्रभागात?
प्रभाग क्र. २० संत तुकारामनगर-कासारवाडी-फुलेनगर-विशाल थिएटर
पिंपरी महापालिकेतील राष्ट्रवादीचे खरे ‘कारभारी’ व माजी महापौर योगेश बहल यांच्याविरोधात सर्वपक्षीय, असे या प्रभागातील चित्र आहे. बहल यांनी प्रभागातील चारही जागा निवडून आणण्याचा चंग बांधलेला असताना त्यांनाच अर्थात सेनापतीलाच पराभूत करण्याची व्यूहरचना विरोधकांकडून सुरू आहे. दाट व संमिश्र लोकवस्ती असलेल्या या प्रभागात मराठी-अमराठीचा मुद्दा, तसेच जातीय समीकरणे निर्णायक ठरणार आहे. अनेक छोटे-छोटे भाग एकत्र करून हा प्रभाग तयार झाल्याने कोणा एकाची मक्तेदारी नाही. परिणामी, मतांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.
पिंपरीतील संत तुकारामनगर, वल्लभनगर, महेशनगर, गंगानगर, एच. ए कॉलनी, हाफकिन, नाणेकर चाळ, विशाल सिनेमा, कासारवाडीचा अर्धा भाग, सीआयआरटी, कुंदननगर व लांडेवाडी झोपडपट्टी असे विद्यमान दहा नगरसेवकांच्या सध्याच्या प्रभागांमधील क्षेत्र यात समाविष्ट आहे. सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी आणि अनुसूचित महिला असे आरक्षण आहे. दाट लोकवस्ती, सोसायटय़ा, बैठी घरे, झोपडपट्टय़ा, स्थानिक-बाहेरचे अशा संमिश्र पट्टय़ात राष्ट्रवादीचा स्पष्ट प्रभाव दिसतो.
त्यामुळेच राष्ट्रवादीला रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला कितपत यश मिळेल, याविषयी साशंकता आहे. कुंदननगरचा काही भाग व लांडेवाडी झोपडपट्टीचा भाग यापूर्वी प्रभागात नव्हता. प्रभागरचनेला आक्षेप घेण्यात आल्यानंतर तो नव्याने समाविष्ट झाला आहे. त्यामुळे सुरुवातीला राष्ट्रवादीच्या दृष्टीने वाटणारे एकतर्फी चित्र आता राहिलेले नाही. मात्र, लांडेवाडीचा भाग आल्याने नगरसेवक जितेंद्र ननावरे यांच्या पथ्यावर पडणार आहे.
खुल्या गटात योगेश बहल, राजेश वाबळे, श्याम लांडे, यशवंत भोसले, कुणाल लांडगे, संदीप लांडगे, दीनानाथ जोशी, संजय यादव आदी दावेदार आहेत. मात्र, सातत्याने निवडून येणाऱ्या बहल यांचे कडवे आव्हान असल्याने त्यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात सर्वच पक्ष आहेत. अद्याप कोणत्याही नावावर एकमत झालेले नाही.
ओबीसी गटात महंमद पानसरे, दत्तोबा लांडगे, सोपान लोंढे, किरण सुवर्णा, गणेश संभेराव, महेंद्र बावीस्कर, नंदू कदम आदी दावेदार आहेत. खुल्या गटातील काही जणांकडे ओबीसीचे दाखले आहेत. त्यामुळे दोन्हीकडे नजर ठेवून बसलेले बरेच जण आहेत. महिला गटात विद्यमान नगरसेविका सुजाता पालांडे, शारदा इंगवले, वर्षां जगताप, मंगला थोरात अशी चर्चेतील नावे आहेत. अनुसूचित गटात नगरसेवक ननावरे यांच्या पत्नी प्रियांका, अशोक बँकेचे संस्थापक अशोक शीलवंत यांची कन्या सुलक्षणा, तसेच गुलजार कांबळे आदी नावे चर्चेत आहेत. खासदार अमर साबळे यांच्या मुलीसाठी या प्रभागाची चाचपणी सुरू आहे. पूर्वीच्या प्रभागातील काही भाग असल्याने नगरसेवक सद्गुरू कदम यांचीही चाचपणी सुरू आहे.