काय चाललंय प्रभागात ?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रभाग क्रमांक २१ पिंपरी गावठाण-पिंपरी कॅम्प-अशोक थिएटर-वैभवनगर

पिंपरी पालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, उपमहापौर प्रभाकर वाघेरे अशा आजी-माजी पदाधिकाऱ्यांची या प्रभागात कसोटी लागणार आहे. चारही जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार असून त्यात खोडा घालण्याची विरोधकांची व्यूहरचना आहे. ‘गावकी-भावकी’, ‘आसवानी-मूलचंदाणी’, ‘मराठी-सिंधी’, ‘खरे ओबीसी-खोटे ओबीसी’ अशा संघर्षमय मुद्दय़ांभोवती फिरणाऱ्या या रंगतदार निवडणुकीचे ‘पैशाचा धूर’ आणि ‘क्रॉस व्होटिंग’ हे वैशिष्टय़ राहणार आहे.

पिंपरी गावठाण, पिंपरी कॅम्प, अशोक थिएटर, बालामाल चाळ, भीमनगर, वैभवनगर, जिजामाता हॉस्पिटल असे क्षेत्र असलेल्या प्रभागात सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी आणि अनुसूचित महिला असे आरक्षण आहे. पिंपरी कॅम्प आणि पिंपरीगाव असे प्रभागाचे दोन प्रमुख भाग आहेत. कॅम्पमध्ये सेवा विकास बँकेचे अर्थकारण आणि आसवानी-मूलचंदाणी परिवारातील संघर्ष हा कळीचा मुद्दा आहे. तर, गावठाणात गावकी-भावकीचे बेरकी राजकारण आहे. समाजसेवेच्या नावाखाली सर्वाना वर्चस्वासाठीच नगरसेवकपद हवे आहे. हरेश आसवानी यांनी एकदा मूलचंदाणींचा पराभव केला. पुढे, मूलचंदाणी यांनी त्याची परतफेडही केली. २००२ ची संजोग वाघेरे विरुद्ध हरेश आसवानी यांच्यातील संघर्षमय लढत अजूनही नागरिकांच्या स्मरणात आहे. स्थानिकांनी केलेली एकजूट तेव्हा आसवानींना भारी पडली होती. २०१२ मध्ये हरेशऐवजी डब्बू आसवानी रिंगणात उतरले, त्यांनी मूलचंदाणी यांचा दारुण पराभव केला. या लढतीत दोन्ही परिवारातील वादाने कळस गाठला. प्रचाराचा नारळ फोडण्यापूर्वीच हाणामारी, तोडफोड असा राडा झाला. दरोडे, अ‍ॅट्रासिटीसारखे गुन्हे दाखल झाले. तरीही ‘कागदोपत्री फरार आणि दारोदारी प्रचार’ असे चित्र तेव्हा होते. आता गावठाण आणि कॅम्प एकत्र करण्यात आल्याने दोन्हीकडील दिग्गज आमने-सामने येणार आहेत.

खुल्या गटात राष्ट्रवादीकडून डब्बू आसवानी यांची उमेदवारी निश्चित आहे. भाजपकडून अमर मूलचंदाणी, धनराज आसवानी, संदीप वाघेरे अशी चाचपणी सुरू आहे. याशिवाय दत्ता वाघेरे, अमर कापसे रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत. ओबीसी गटात प्रभाकर वाघेरे, संदीप वाघेरे, गोकुळ भुजबळ, दिलीप कुदळे, राजाराम कुदळे, तर महिला गटात उषा वाघेरे, सुनीता वाघेरे, मीना नाणेकर, गिरिजा कुदळे, ज्योतिका मलकानी, माधुरी मूलचंदाणी, सविता आसवानी, पूनम कापसे अशी नावे चर्चेत आहेत. वाघेरे परिवाराचा याहीवेळी ‘डब्ल्यू-३’ साठी प्रयत्न असू शकतो. कुदळे परिवाराचा एकच उमेदवार देण्यासाठी बैठका सुरू आहेत. मात्र, ठोस निर्णय होताना दिसत नाही. अनुसूचित महिला गटात सर्वाचाच सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. पक्षनिष्ठा खुंटीला टांगून अनेकांनी पक्षबदल केला आहे. गेल्या वेळी वेगळ्या चिन्हावर लढलेले यंदा उमेदवारीसाठी दुसऱ्याच पक्षाच्या दारात आहेत. चारपैकी तीन गटात पैशाचा मोठा वापर होणार आहे. त्यामुळे मतांचा बाजार हेच येथील वैशिष्टय़ राहणार असून काहीही झाले, तरी क्रॉस व्होटिंग होणार, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation ward no 21 detail