पिंपरी : महापालिका हद्दीत विनापरवानगी किंवा पावसाळ्यात बेकायदा रस्ताखोदाई केल्यास संबंधित ठेकेदार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच महापालिका हद्दीतील अतिधोकादायक झाडांबाबतच्या तक्रारींचा आता २४ तासांत निपटारा होणार आहे. त्यासाठी ‘सारथी’ हेल्पलाइनच्या धर्तीवर नवीन ऑनलाइन संकेतस्थळ तयार केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा विभाग, फायबर नेटवर्किंग, महावितरण, एमएनजीएलची पाइपलाइन टाकण्यासह विविध कामांसाठी रस्तेखोदाई केली जाते. पावसाळ्यात अशी खोदाई सुरू ठेवल्यामुळे खड्डे पडणे, पाणी साचणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणे आणि वाहतूककोंडीसह अपघाताच्या घटनांमध्येही वाढ होते. काही ठेकेदार कंपन्या किंवा खासगी जागामालक महापालिकेची परवानगी न घेता खोदाई करतात. सेवावाहिन्यांच्या कामासाठी वारंवार केले जाणारे खोदकाम आणि त्यानंतर केल्या जाणाऱ्या दुय्यम दर्जाच्या रस्तेदुरुस्तीमुळे शहरातून वाहन चालविणे अवघड होते. त्यामुळे लहान-मोठे अपघात होतात. ते टाळण्यासाठी शहरातील मुख्य रस्ते आणि अतिवर्दळीच्या रस्त्यांवरील जलवाहिन्या, जलनिस्सारण वाहिका, पावसाळी गटारे, इंटरनेट आणि अन्य केबल, एमएनजीएल, तसेच वीजवाहिन्यांची कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मुदत संपल्याने आता खोदकामाचे परवानेही बंद केले आहेत. पावसाळ्यात विनापरवाना खोदाई केल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

हेही वाचा : पिंपरी : पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड शहर तुंबणार?

शहरात रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. रस्तेखोदाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्तेखोदाईला परवानगी देऊ नये, अशी सूचना प्रशासनाला केली आहे.

महेश लांडगे (आमदार, भोसरी)

हेही वाचा : पिंपरी : पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच इंद्रायणी नदीच्या पाण्यावर फेस

खोदाईचे परवाने बंद केले आहेत. पावसाळ्यात कोणीही खोदाई केल्यास गुन्हा दाखल केला जाईल.

विजयकुमार खोराटे (अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका)
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation warns of criminal action if roads dug up during monsoon pune print news ggy 03 css