पिंपरी : मोशी, बोऱ्हाडेवाडी येथील सिल्वर ओक्स गृहनिर्माण सोसायटीतील १०८ सदनिकाधारकांकडे ४६ लाख ६७ हजार २८७ रुपयांची मालमत्ताकराची थकबाकी आहे. नोटीस देऊनही कराची थकबाकी न भरल्याने अखेर महापालिकेने साेसायटीचे सहा नळजोड तोडून पाणी बंद केले आहे. यापुढील काळात ४० टक्क्यांपेक्षा जास्त सदनिकाधारकांकडे थकबाकी असल्यास साेसायटीचे नळजाेड खंडित करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
पिंपरी महापालिकेच्या कर संकलन विभागाने वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. मोशी करसंकलन कार्यालय हद्दीतील बोऱ्हाडेवाडीतील सिल्वर ओक्स सोसायटीतील ‘अ’ इमारतीमधील ४८ सदनिकाधारकांपैकी २० जणांकडे सात लाख ६५ हजार ३३१ रुपये, ‘ब’ इमारतीमधील १०७ पैकी ७० जणांकडे ३५ लाख ५१ हजार ५४७ आणि ‘क’ इमारतीच्या एकूण ५४ सदनिकाधारकांपैकी १८ जणांकडे तीन लाख ५० हजार ४१९ रुपये इतका मालमत्ता कर थकीत आहे. तिन्ही इमारतीमधील १०८ सदनिकाधारकांकडे ४६ लाख ६७ हजार २८७ रुपयांची थकबाकी आहे. या तिन्ही इमारतीला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून बारा नळजोडद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातील सहा नळजाेड खंडित करून पाणीपुरवठा बंद केला आहे. दोन दिवसांत थकीत मालमत्ता कर न भरल्यास उर्वरित सहा नळजोड तोडण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
७२ कोटींची पाणीपट्टी वसुली
कर संकलनाचे उत्पन्न वाढत असताना पाणीपट्टीत घट हाेत हाेती. पाणी पुरवठा विभागाला अपुऱ्या मनुष्यबळामुळे वसुली करण्यात अडथळे येत हाेते. त्यामुळे मागील वर्षापासून महापालिकेच्या कर संकलन विभागाकडेच पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात पाणीपट्टीतून शंभर काेटी ७८ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १७ मार्चअखेर ७१ काेटी ८६ लाख रुपयांची वसुली झाली आहे. १३ दिवसांत २८ काेटी ८२ लाख रुपयांची वसुली करण्याचे आव्हान आहे.
सोसायटीतील सदनिकाधारकांनी मालमत्ता कराचा थकीत भरणा करावा. यापुढे ४० टक्क्यांपेक्षा जास्त सदनिकाधारकांकडे थकबाकी असल्यास साेसायटीचे नळजाेड खंडित केले जाणार आहे. पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.