पिंपरी : शहरामध्ये स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सन २०२४ मधील स्वच्छ सर्वेक्षण फेब्रुवारीत होणार आहे. या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे. क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सफाई कर्मचारी व घरोघरचा कचरा संकलन करणा-या वाहनांवरील कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

पिंपरीतील संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘अ’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य व सुरक्षेबाबत पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, सहायक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे, राजू साबळे,  मुख्य आरोग्य निरीक्षक भूषण शिंदे, दत्तात्रय गणगे, आरोग्य निरीक्षक रुपाली साळवे, संतोषी कदम, वैभव केचन गौडार, मुकेश जगताप, लक्ष्मण साळवे, स्नेहा चांदणे यावेळी उपस्थित होते.

सचिन पवार म्हणाले, ‘शहराला स्वच्छ व सुशोभित ठेवण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. स्वच्छतेचे काम करताना सफाई मित्रांनी उपयुक्त साधने व उपकरणे वापरणे आवश्यक आहे. महापालिकेच्या वतीने देण्यात येणारे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांनी आत्मसात करून त्याचा दैनंदिन कामामध्ये अवलंब करावा. आरोग्य निरीक्षक व सफाई मित्र यांनी स्वच्छता करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा. आरोग्याच्या चांगल्या सवयींचा अंगीकार करावा, आरोग्याची वेळोवेळी तपासणी करावी’.

‘कॅम फाऊंडेशन’ यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालयातील ‘अ’, ‘ब’ मधील महापालिका, ठेकेदार व कंत्राटी सफाई कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सफाई कर्मचाऱ्यांना पीपीई कीटचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी स्वच्छ भारत अभियान क्षमता बांधणी, कौशल्य विकास व ज्ञान व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी कर्मचाऱ्यांना  कचरा वर्गीकरण करताना सुरक्षा साधनाचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाच्या सत्रात कॅम फाउंडेशनच्या राहुल सोनावणे यांनी घनकचरा व्यवस्थापन कायदा २०१६ विषयी मार्गदर्शन केले. तसेच घन कचरा व्यवस्थापन कसे करावे या विषयी माहिती दिली.

Story img Loader