पिंपरी : महापालिकेने कचराभूमीसाठी निश्चित केलेली पुनावळेतील २२.८ हेक्टर जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्या जागेच्या बदल्यात राज्य शासनाच्या वन विभागास चंद्रपूर जिल्ह्यातील जागा दिली जाणार आहे. महापालिकेने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव पाठविला असून महापालिका जागा खरेदी करून वन विभागास देणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाला ११०० टन ओला व सुका कचरा जमा होतो. मोशीतील कचराभूमीत हा कचरा टाकला जातो. तेथील जागा ८१ एकर आहे. ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण केले जाते. सुक्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जात आहे. प्लास्टिक कचऱ्यापासून इंधननिर्मिती केली जात आहे. पण, मोशी कचराभूमीची क्षमता संपुष्टात आली आहे. या ठिकाणी १९९१ पासून कचरा आणून टाकला जात आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडसाठी होणार आता स्वतंत्र कामगार आयुक्तालय
कचऱ्याचे ढीग हटविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून बायोमॉनिंग प्रकल्प दोन टप्प्यात राबविला जात आहे. वेगाने नागरीकरण वाढत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील भविष्याची गरज ओळखून पुनावळे येथे कचराभूमीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. तेथील जागा कचराभूमीसाठी सन २००८ मध्ये मंजूर करण्यात आली. पण, जागा ताब्यात घेण्यास पालिकेस अद्याप यश आलेले नाही. त्या २२.८ हेक्टर जागेच्या बदल्यास पालिकेने मुळशी तालुक्यातील पिंपरी येथील जागा वन विभागास देण्याची तयारी दर्शविली होती; मात्र तेथे मोठ्या प्रमाणात मुरूम असल्याचे कारण देत ती जागा नाकारली होती.
हेही वाचा : पिंपरी चिंचवडमधील दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू
आता चंद्रपूर येथील जागा वन विभागाने सुचविली आहे. जागा शोधण्यास महापालिकेने सुरुवात केली. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पत्रव्यवहार केला जात आहे. यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नुकताच चंद्रपूरचा दौराही केल्याची माहिती नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.