पिंपरी : महापालिकेच्या अग्निशामक विभागाने शहरातील ६२३ खासगी दवाखाने, रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दहा दिवसांत मागविली आहे. त्यानंतर ती उपाययोजना कार्यान्वित आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. तसेच, पुढील आठवड्यात शहरातील सर्व खासगी शाळांनाही याबाबत नोटीस दिली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुग्णालयात आग लागून दुर्घटना घडल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील ६२३ खासगी रुग्णालये, दवाखान्यांना नोटीस दिली आहे. रुग्णालय, दवाखाना व्यवस्थापकांनी अंतर्गत अग्निसुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजना, बसवलेल्या यंत्रणा अद्ययावत आहेत का, याची माहिती दहा दिवसांत देण्याची सूचना केली आहे. त्यानंतर अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांची अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार आहे. तसेच अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक केले आहे. अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्राचे वार्षिक नूतनीकरण करावे लागणार आहे. यामध्ये अद्ययावत अग्निसुरक्षा योजना, उपकरणे देखभाल आणि कर्मचारी प्रशिक्षणाची माहिती द्यावी लागणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांसाठी अग्निरोधक, आपत्कालीन कार्यपद्धती आणि अग्निशामक उपकरणांचा वापर या विषयी प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावा लागणार आहे.

हेही वाचा…राज्यात गुजरातमधून बनावट बियाणांचा पुरवठा, अंबादास दानवे यांचा आरोप

सुरक्षा यंत्रणेची तपासणी

अग्निशामक उपकरणे, आग विझवणाऱ्या यंत्रांची कालबाह्यता तारीख, पाण्याचा पुरेसा दाब आहे का, संपूर्ण सुविधेमध्ये ‘अलार्म’ कार्यरत आणि ऐकू येण्यासारखे आहेत का, याची खात्री केली जाणार आहे. अतिदक्षता विभागासारख्या अतिसंवेदनशील भागाचे विद्युत लेखापरीक्षण केले आहे का, ज्वलनशील सामग्री ओळखणे, अग्नी प्रतिरोधक पर्याय उपलब्ध आहेत का, रुग्णांच्या काळजी क्षेत्रामध्ये ज्वालाग्राही सामग्री बदलण्यासाठी सामग्रीचे लेखापरीक्षण केले आहे का आदी तपासणी करण्यात येणार आहे.

शाळांचीही तपासणी

शहरातील सर्व खासगी शाळांमधीलही अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांची तपासणी केली जाणार आहे. शाळांना पुढील आठवड्यात नोटीस दिली जाणार आहे.

हेही वाचा…केंद्रीय मंत्री मोहोळांच्या समोरच भाजपाच्या दोन गटात हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

शहरातील रुग्णालये, दवाखाने यांना नोटीस देऊन अग्निसुरक्षा संबंधित विचारणा केली आहे. माहिती आल्यानंतर यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. अग्निशामककडून ना हरकत दाखला (एनओसी) घेणे बंधनकारक आहे. ना हरकत दाखल नसलेल्या रुग्णालयांना वैद्यकीय परवाना दिला जाणार नाही. – मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशामक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal fire department issues notices to 623 private clinics and hospitals for fire safety compliance pune print news ggy 03 psg
Show comments