पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी चितारलेल्या चित्रांनी महापालिकेची भिंत सजवण्यात आली आहे. या चित्रांमुळे जणूकाही महापालिकेच्या भिंती बाेलू लागल्या आहेत.

महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे नुकताच ‘कॅनव्हास ऑफ क्युरिऑसिटी’ हा चित्रकला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात आकांक्षा फाउंडेशनच्या पाच शाळांसह महापालिकेच्या ३४ शाळा सहभागी झाल्या. मेळाव्यात ४० शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली २९० विद्यार्थ्यांनी चित्रे चितारली. त्यात उत्कृष्ट ठरलेल्या चित्रांची निवड करून ती महापालिकेच्या जिन्यातील भिंतींवर लावण्यात आली आहेत. या चित्रांमध्ये ‘माझे गाव’, ‘माझे विश्व’, ‘विविधतेतील एकता’, ‘परंपरा आणि आधुनिकता’ असे विषय मांडण्यात आले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी या चित्रांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या चित्रकलेचे कौतुक केले.

सहायक आयुक्त विजयकुमार थोरात याबाबत म्हणाले, की उपक्रमातील उत्कृष्ट चित्रांची चित्रकलेच्या शिक्षकांनी उत्कृष्ट चित्रांची निवड केली. या उपक्रमातून एकूण ५० चित्रांची निवड करण्यात आली आहे. चित्रांच्या निवडीमागे ठरावीक असे काही निकष नव्हते.

महापालिकेच्या भिंतीवर लावण्यात आलेली विद्यार्थ्यांची चित्रे ही विविध सामाजिक संदेश देणारी आहेत. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांमध्ये त्यांच्यातील रंगसंगतीचे भान, विषयाचे सादरीकरण करण्याची कला, सर्जनशीलता दिसून येत आहे. शिक्षण विभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी म्हटले आहे.

महापालिकेच्या शाळेत ४३ हजार विद्यार्थी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा असून यामध्ये ४३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून विविध नवीन उपक्रम राबविले जातात. गतवर्षी जल्लोष शिक्षणाचा उपक्रम राबविला होता. दर दोन वर्षांनी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यंदा हा उपक्रम राबविला नव्हता. पुढील वर्षी राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता मागीलवर्षी पासून भारत दर्शन अभ्यास दौरा सुरू केला आहे. यंदा महापालिकेने पाचवी व आठवी मधील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १५ विद्यार्थ्यांना भारत दर्शन अभ्यास दौऱ्यावर पाठविले होते. या विद्यार्थ्यांनी बंगळुरू, म्हैसूर, उटी आणि कोईम्बतूर येथे अभ्यास दौरा केला आहे.

Story img Loader