पिंपरी : शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. मात्र, अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना अडचणी येतात. यासाठी अग्निशमन विभागात १५० फायरमनची सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. शहरात झोपडपट्ट्यांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. मोठ्या संख्येने औद्योगिक तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या सुरू झाल्या आहेत. लोकसंख्येनुसार शहरामध्ये १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत. लोकसंख्या वाढत असताना अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अग्निशमन विभागात प्रशासकीय कामकाजामधील अधिकारी, कर्मचारी वगळता सहा लिडिंग फायरमन तर ३० फायरमन कार्यरत आहेत. भविष्यात पिंपरीत मध्यवर्ती केंद्रासह दहा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची आणखी गरज आहे.

हेही वाचा…“मेक इन इंडिया, विकसित भारत घोषणाबाजीने बदल घडत नाही!”, असं का म्हणाले राजीव बजाज…

अग्निशमन विभागात कर्मचारी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयार केलेल्या आकृतीबंधानुसार १९१ पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार यामध्ये १५० फायरमन, दहा सह अधिकारी, सहा स्थानक अधिकारी, १५ यंत्रचालक, दहा लिडिंग फायरमन अशा १९१ पदांची सरळ सेवेने भरती करण्याचे अग्निशमन विभागाचे भविष्यात नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील ‘ड’ संवर्गातील अग्निशमन विमोचन, फायरमन ही १५० रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा…कोकणातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट? काजू उत्पादनात घट; दरही कमी

यासाठी जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या भरतीची सविस्तर माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १५० फायरमनची सरळसेवेने भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहेत, असे अग्निशमन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipality going to recruit 150 firemen pune print news ggy 03 psg