पिंपरी : महापालिका सार्वजनिक-खासगी भागीदारीतून थेरगावात ६० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारणार आहे. रुग्णालयाच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार आरोग्यसेवेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भविष्यात १०० खाटांपर्यंत कर्करोग रुग्णालयाचा विस्तार करण्यात येणार आहे. ३४ हजार ८४८ चौरस फुटांमध्ये रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि शस्त्रक्रिया यांसारख्या सामान्य कर्करोगाच्या उपचारांव्यतिरिक्त रुग्णालय समुपदेशन आणि पुनर्वसन यांसारख्या सहायक सेवाही या रुग्णालयात पुरविण्यात येणार आहेत. रुग्णालयात फुफ्फुस, कोलोरेक्टल, प्रोस्टेट आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या उपचाराच्या सुविधा असणार आहेत. महात्मा जोतिबा जन आरोग्य योजना, केंद्र सरकारची आरोग्य योजना लागू असणार आहे. सर्वांना अल्प दरात उपचार उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा…पिंपरी : अखेर भोसरीतील कृत्रिम धावमार्ग खेळाडूंसाठी खुला

कर्करोग रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांमध्ये तृतीय श्रेणी तसेच दुय्यम श्रेणी रुग्णालये आणि दवाखाने यांचा समावेश होतो. प्रस्तावित कर्करोग रुग्णालय नव्याने बांधण्यात आलेल्या थेरगाव रुग्णालय परिसरात उभारण्यात येणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipality to establish 60 bed cancer hospital plans near thergaon pune print news ggy 03 psg