पिंपरी नवनगर विकास प्राधिकरणावर गेल्या तेरा वर्षांपासून लोकनियुक्त अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेवर आलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार तरी अध्यक्षपदाची निवड करेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, या सरकारनेही अध्यक्षपदाबाबत अडीच वर्षांत कोणताही निर्णय घेतलेला नाही. महापालिका निवडणुकीमध्ये अनेक इच्छुकांना लाल दिवा देण्याचे आश्वासन भाजप नेतृत्वाकडून देण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर आता भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची आशा निर्माण झाली आहे.
सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या पिंपरी नवनगर विकास प्राधिकरणावर आतापर्यंत २१ शासकीय अधिकाऱ्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. केवळ सात लोकनियुक्त अध्यक्षांनी प्राधिकरणाचा कारभार चालवला. सन २००१ ते २००४ पर्यंत बाबासाहेब तापकीर हे अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर प्राधिकरणाला लोकनियुक्त अध्यक्षपद मिळालेले नाही. त्यानंतर या पदावर विभागीय आयुक्तच अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. सध्या पुणे विभागीय आयुक्त प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील वादांमुळे या पदावर दोन्ही पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्यांची निवड झाली नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या वेळी अनेक वेळा प्राधिकरणाचे अध्यक्षपद जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केले होते.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता स्थापन झाली. भाजप आणि शिवसेना हे पक्ष सत्तेत सहभागी असल्यामुळे या दोन्ही पक्षांतील कोणत्यातरी एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला प्राधिकरणाचे अध्यक्षपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अडीच वर्षांपासून वाट पाहत असलेल्या कार्यकर्त्यांच्या हाती काहीच पडलेले नाही. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांना पक्षात प्रवेश देत मोठी आश्वासने दिली. अनेकांना लाल दिवा देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी चिकाटीने कामही केले. त्यामुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. त्याचे फळ म्हणून लाल दिवा मिळावा अशी अपेक्षा भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना आहे. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता भाजप नेतृत्वाकडून होते का नाही हे लवकरच दिसणार आहे.