पिंपरी चिंचवड : “राज्यातील सत्ताधार्यांच्या दबावाखाली सध्या महानगरपालिकेतील कारभार सुरू आहे. केवळ राजहट्टापायी शहरवासियांवर प्रशासक आणि प्रशासनाने पाण्याचे दुर्भिक्ष लादले आहे. या कारभाराचा निषेध करावा तेवढा थोडाच असून, भाजपाच्या दबावामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे शहराची आणि महापालिकेची पुरती वाट लागली”, अशी घणाघाती टीका पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली.
पिंपरी-चिंचवडच्या नेहरूनगर येथील साई मंदिराच्या सभागृहात पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची आठवी मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अजित गव्हाणे बोलत होते. ते म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षांपासून शहरवासियांवर पाणीटंचाईचे संकट भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी निर्माण केले. भ्रष्टाचार, लाचखोरी आणि खंडणीखोरीमुळे शहराचे नाव मलीन करण्याचे कृत्य या सत्ताधार्यांनी केले. आता केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन केले जात नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईच्या आडून टँकरची लॉबी पोसण्याचे पाप केले जात आहे. हा सर्व प्रकार राज्यातील सत्तेच्या जोरावर प्रशासकाच्या आडून केला जात आहे.
महापालिका निवडणुका केव्हाही लागू शकतात. त्यामुळे आपण तयारीत राहिले, पाहिजे असे आवाहनही गव्हाणे यांनी यावेळी केले. भाजपाचा भ्रष्ट कारभार शहरातील जनतेला समजला असून, येत्या महापालिका निवडणुकीत जनताच भाजपाला धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रत्येक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचार करतानाच मोठी ताकद उभी केल्याबद्दल पोटनिवडणुकीतील उमेदवार तथा माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले. तसेच येणार्या प्रत्येक निवडणुकीत विजयी होण्याच्या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सभेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते योगेश बहल, कार्याध्यक्ष राहुल भोसले, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवकचे अध्यक्ष इम्रान शेख, महिला निरीक्षक शितल हगवणे, माजी नगरसेवक शाम लांडे, विनायक रणसुभे, विक्रांत लांडे, समीर मासुळकर, माजी महापौर वैशाली घोडेकर, गीता मंचरकर, संगीता ताम्हणे, वर्षा जगताप, विजय लोखंडे, गोरक्ष लोखंडे, संजय अवसरमल यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.