विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय बालेकिल्ल्यात प्रचंड पडझड झाली. पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीनही मतदारसंघांत राष्ट्रवादीचा पराभव झाला. या पराभवास काँग्रेसची आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांची नीती जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने काँग्रेसलाच लक्ष्य केले आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर अशा महत्त्वाच्या विषयांबाबत निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये संताप होता व त्या निर्णयांचे विभाग काँग्रेसकडे होते. त्यांनी निर्णयच घेतले नाहीत, त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला आणि आम्हाला मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले, असा राग आता राष्ट्रवादीकडून आळवला जात आहे.
राष्ट्रवादीच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारून शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तथापि, तो अद्याप स्वीकारण्यात आला नाही. राजीनामा दिल्यानंतरही बहल यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडत काँग्रेसी नेत्यांचा जोरदार समाचार घेतला. काँग्रेससह आमच्याच लोकांमुळे ही वेळ आल्याचे सूचक विधान त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतानाही केले. राष्ट्रवादीला तीनही मतदारसंघांत आलेले अपयश दुर्दैवी आहे. नागरिकांना बदल हवा होता, हेच त्यातून दिसून आले. विलास लांडे यांचे आमदार म्हणून चांगले काम असतानाही भोसरीत त्यांचा पराभव झाला आणि तेथे आमचाच बंडखोर विजयी झाला. पिंपरीत निसटता पराभव स्वीकारावा लागला. तर, चिंचवडमध्ये वाढलेला सुशिक्षित मतदारांचा टक्का निर्णायक ठरला. अजित पवारांनी शहरासाठी भरपूर काम केले, शहरात राष्ट्रवादीने विकासकामे केली, दादांनी कार्यकर्त्यांना मोठे केले. अनेकांना महापौर, स्थायी समिती अध्यक्ष वा सदस्य तसेच आमदार केले. मात्र, तरीही असा पराभव पाहावा लागला, याचे दु:ख वाटते.
राष्ट्रवादीचे म्हणणे असे आहे, की हे अपयश आमच्याच लोकांमुळे आले. त्यामुळेच या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून बहल यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पडझड झाली तरीही पक्षाचे नगरसेवक पक्ष सोडून जातील अशी चर्चा असली, तरी तसे काहीही होणार नाही. यापुढे चांगले काम करू व परिस्थिती सुधारू. अडीच वर्षांनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत काय ते चित्र स्पष्ट होईल, असा विश्वासही बहल व्यक्त करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा