पिंपरी: उपमुख्यंमत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवड शहरात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. वाघेरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पवार गटाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.
मातोश्रीवर झालेल्या भेटीदरम्यान खासदार संजय राऊत, राज्य संघटक एकनाथ पवार, ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, योगेश बाबर उपस्थित होते.
संजो वाघेरे हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मागील वेळी त्यांनी जोरदार तयारी केली होती. पण, ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे वाघेरे यांना माघार घ्यावी लागली होती. आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागा सुटण्याची शक्यता असल्याने वाघेरे यांनी ठाकरे गटाच्या पर्यायाची चाचपणी सुरु केल्याचे दिसते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे हे अजित पवार यांच्यागटात होते. पवार शहरात असतानाच वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अजितदादांना धक्का बसण्याची शक्यता आहे. वाघेरे यांना ठाकरे गटाकडून मावळमधून उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.