पिंपरी पालिकेत एकहाती सत्तेची हॅटट्रिक करण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या चिंचवड येथे रविवारी झालेल्या मेळाव्यात करण्यात आला. पक्षाचे नेते अजित पवार यांच्या साक्षीने पक्षांतर्गत खदखद व उखाळ्या-पाखाळ्यांचे प्रदर्शनही झाले. मुख्यमंत्री नीट नव्हता, त्यामुळे राष्ट्रवादीचे वाटोळे झाले, या शब्दात माजी आमदार विलास लांडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आणि पक्ष सोडण्याचा सूचक इशाराही दिला.
रामकृष्ण मोरे नाटय़गृहातील निर्धार मेळाव्यास माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, महापौर शकुंतला धराडे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, पक्षनेत्या मंगला कदम आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ‘लक्ष्य २०१७’ मध्ये सत्तेची हॅटट्रिक करण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला. बऱ्याच दिवसांनंतर आलेल्या अजितदादांसमोरच कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या. पराभवाचे शल्य असलेल्या लांडे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, आपल्याला संपवण्याचे राजकारण सुरू आहे. आपल्याला जवळ न केल्यास माझा मी विचार करण्यास मोकळा आहे. नेते म्हणवणारे बहल एकटेच निवडून येतात, त्यांना दुसऱ्याला निवडून आणता येत नाही. पक्षनेत्या मंगला कदम नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. आपल्यापेक्षा कोणी मोठा होता कामा नये, हा विचार डोक्यातून काढला तरच पक्ष टिकेल. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटला नाही. भोसरीतून महेश लांडगे यांना उमेदवारी द्या, मी थांबायला तयार आहे, असे आपण अजितदादांना सांगितले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. बहल म्हणाले, आपला पराभव आपणच करतो, हे लोकसभा आणि विधानसभेत दिसून आले. आपलेच लोक विरोधकांच्या सल्ल्याने राष्ट्रवादीच्या विरोधातील वक्तव्ये करतात. सदस्यनोंदणीसाठी सर्वाची मनधरणी करावी लागली. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून चालढकल करण्यात आली. हे काम एकटय़ा शहराध्यक्षाचे नसून प्रत्येकाचे आहे. पानसरे म्हणाले, दोन निवडणुकांमध्ये आपल्यातील भांडणाचा फटका बसला. ज्यांना पदे दिली, तीच लोक पक्ष सोडून गेली. भाजप-सेनेवाले बोलण्यात पटाईत आहेत. आपण प्रसिद्धीत कमी पडतो. सभागृहातील तुडुंब गर्दीचा संदर्भ देत लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ही मंडळी कुठे गेली होती, एवढे सगळे बाहेर पडले असते, तर आपले उमेदवार पराभूत झाले असते का, असा मुद्दा शकुंतला साठे यांनी उपस्थित केला. निष्ठावंतांना तिकिटे मिळत नाही. नेते गाडय़ांच्या काचाही खाली करत नाहीत. हेच स्वत:ला ‘साहेब’ आणि ‘दादा’ समजतात, असे त्या म्हणाल्या. अर्जुन ठाकरे म्हणाले, अजितदादा आले की सगळे येतात. पक्षाच्या कार्यक्रमांना कोणी फिरकत नाहीत. अद्याप पक्षाचे कार्यालय सुरू होऊ शकले नाही. प्रास्तविक संजोग वाघेरे यांनी केले. विजय लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले.
‘पक्षाला वेठीस धरू नका; सभा तहकूब करू नका’
प्रमुख नेत्यांनी आपापसातील मतभेद मिटवून घ्यावेत, असे आवाहन अजित पवार यांनी आपल्या भाषणात केले. एकजूट राखल्यास निश्चित यश मिळेल. अन्यथा पक्षाला किंमत मोजावी लागते. पक्षाला वेठीस धरू नका. सतत सभा तहकूब करू नका. जाहीरनाम्याची पूर्तता करा. प्रभागामधील कामे पूर्ण करा. पारदर्शकता ठेवा. हलक्या कानाचे होऊ नका, असे आवाहन अजितदादांनी केले. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader