भाजप मंत्र्यांचे परस्परविरोधी दावे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण महापालिकेत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी राजकीय वर्तुळात होत असून भाजपचे स्थानिक नेतेही त्यासाठी आग्रही आहेत. मात्र,पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्राधिकरण ‘पीएमआरडीए’मध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे चिंचवड येथे जाहीर केले. विशेष म्हणजे, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सातारा दौऱ्यावर असताना, प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी पिंपरी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांला संधी देणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. त्याच दिवशी बापट यांनी विलीनीकरणाची घोषणा केल्याने भाजप वर्तुळातच संभ्रमावस्था आहे.

पिंपरी प्राधिकरण पालिकेत वर्ग करणार, बरखास्त करणार की पीएमआरडीएमध्ये विलीन करणार, यावरून गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. तथापि, कोणताही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. प्राधिकरण महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी स्थानिक भाजप नेते आग्रही आहेत. विरोधी मंडळींकडून प्राधिकरण बरखास्त करण्याची मागणी अधून-मधून होत असते. तर, विलीनीकरणाची भाषा सत्ताधारी गटाकडून सुरूच आहे. अशा परिस्थितीत, सोमवारी चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी बापट आले असता, पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्राधिकरण ‘पीएमआरडीए’मध्ये विलीन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याचवेळी, सातारा येथे चंद्रकांत पाटील यांनी प्राधिकरणाचे अध्यक्षपद भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांला देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे एकूणच या विषयावरून भाजपमध्येच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. बापट यांच्या घोषणेचे पडसाद भाजपमध्येच उमटू लागले असून उशिरापर्यंत भाजप नेत्यांचा एकमेकांशी संपर्क सुरु होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad new town development authority bjp