पुण्यातील सामूहिक बलात्कारप्रकरणी सरकार कठोर पावले उचलत असून आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होईल असे प्रयत्न करणार असल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बारामती विधानसभेबाबतदेखील वक्तव्य केलं आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांच्या हस्ते आज सकाळी ७ वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत ऑनलाइन आणि प्रत्यक्षरीत्या जाऊन विकासकामांची उद्घाटने झाली.

हेही वाचा >>> पिंपरी : राज्याच्या तिजोरीत खडखडाट? अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, ‘राज्याची आर्थिक’…

अजित पवार म्हणाले, पुण्यातील सामूहिक बलात्कार ही गंभीर घटना आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चर्चा केली. यावर कठोर पावलं उचलली जाणार असल्याचं अजित पवार यांनी अधोरेखित केलं. पुढे ते म्हणाले, पुणे पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले आहेत. त्यांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आरोपींवर दहा लाखाचं बक्षीसदेखील ठेवण्यात आलं आहे, त्यामुळे हे आरोपी लवकरात लवकर पकडले जातील. त्यांना आम्ही फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचेदेखील अजित पवारांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, बारामती विधानसभेबाबत महायुतीतील कुठल्या पक्षाला जागा मिळणार हे बघून बारामतीकरांना हवा तो योग्य उमेदवार दिला जाईल, असंदेखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरूर-चिंचवडमधून लढणार असल्याची चर्चा आहे. अशातच बारामतीतील कार्यकर्त्यांनी अजित पवारांनी बारामती विधानसभा लढवावी अशी आग्रही भूमिका घेतली होती; त्यानंतर अजित पवारांनी आज त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.