लेडीज वर्सेस रिकी बहल या हिंदी चित्रपटात जसा रणवीर सिंग हा तरुणींना विश्वासात घेऊन आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा आणि लाखोंची फसवणूक करून त्यांच्या आयुष्यातून निघून जायचा. असाच काहीसा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये उघड झाला आहे. चेन्नई येथील ३२ वर्षीय प्रेमराज थेवराजने शेकडो तरुणींना लग्नाचे वचन देत तरुणींशी लग्न, साखरपुडा करत फसवणूक केल्याचं उघड झाले असून त्याने या तरुणींक़डून लाखो रुपये उकळले आहेत. 

त्याने आत्तापर्यंत तब्बल १०० पेक्षा अधिक तरुणींना फसवलं असून सध्या तो ६०- ८० तरुणीच्या चॅटिंगद्वारे संपर्कात होता. त्याच्याकडून ७ मोबाईल आणि १३ वेगवेगळ्या कंपनीचे सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत वेगवेगळ्या राज्यातील तरुणींना फसवले असून यात चेन्नई येथील तरुणी सोबत विवाह करून तिची ९८ लाखांची, ठाणे येथील तरुणीला विश्वासात घेऊन तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून ४५ लाखांची, पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणीची १२ लाखांची आणि हिंजवडी येथील तरुणीची २० हजारांची फसवणूक केल्याचं उघड झाले आहे. प्रेमराजला पुण्यातील विमानतळावरून अटक करण्यात आली. अशा प्रकारे फसवणूक झालेल्या तरुणींनी पुढे येऊन प्रेमराजविरोधात तक्रार द्यावी, असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या विविध वेबसाइटवरून तरुणींशी संपर्क करून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक करणाऱ्या प्रेमराजला बेड्या ठोकण्यात निगडी पोलिसांना यश आले आहे. उच्चशिक्षित तरुणींना तो जाळ्यात ओढायचा. निगडी येथील एका तरुणीला लग्नाच्या वेबसाइटवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मी मोठा कॉन्ट्रॅक्टर असल्याचं सांगत आपण लग्न करू असे सांगितले. तरुणीने प्रेमराजच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. दरम्यान, मला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे, तू मला १२ लाख दे असे म्हणून तरुणीकडे पैशांची मागणी केली. आपण त्याच्याशी लग्न करणार आहोत. तो होणारा पती आहे असं म्हणून तरुणीने ११ लाख रुपये प्रेमराजला दिले. काही महिन्यांनी तरुणीला चेन्नई येथे बोलवून कोऱ्या कागदावर सह्या घेऊन आपलं लग्न झाल्याचं भासवले. माझा मित्र रजिस्टर ऑफिसमध्ये कामाला असून तो रीतसर लग्नाचं रजिस्ट्रेशन करून घेईल असे सांगितले. नंतर, तिला बनावट लग्नाचे सर्टिफिकेट पाठवून दिले. मात्र, त्यांनतर प्रेमराजने तरुणीला मी तुझा पती आहे, तुझ्या नावावर ८० लाखांची कर्ज काढून दे, अन्यथा तुझ्या आई वडिलांचे बरेवाईट करेन अशी धमकी फोनद्वारे दिली. फिर्यादी तरुणीने पैसे परत मागितले असता देण्यास नकार दिला. या प्रकरणामुळे निगडी पोलिसात प्रेमराजच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, त्याच्या शोधात निगडी पोलीस होते. त्यासाठी एक प्लॅन करण्यात आला. पोलिसांनी फिर्यादी तरुणीला आरोपीला पुण्यात बोलवण्यास सांगितले. प्रेमराज हा चेन्नईवरून विमानाने पुण्यात आला. तिथे फिर्यादी तरुणीला बोलावले, तो वेळोवेळी व्हिडिओ कॉल करून तरुणी एकटीच आहे का याची खात्री करायचा. दरम्यान, तरुणी जात असलेल्या कॅबचा चालक हा पोलीस कर्मचारी होता. तसेच, आजूबाजुच्या गाड्यांमध्ये साध्या वेशातले पोलीस होते. पुण्यातील विमानतळावर पोहोचताच दोघांची भेट झाली. तेव्हा, तरुणीने कॅबमध्ये पर्स राहिल्याचं सांगत प्रेमराजला कॅबजवळ आणलं. तिथेच पोलिसांनी त्याला गराडा घातला आणि बेड्या ठोकल्या. प्रेमराजकडून ७ मोबाईल, १३ सिमकार्ड, ४ एटीएम कार्ड, वेगवेगळ्या नावाचे दोन पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस कर्मचारी सतीश ढोले यांच्या पथकाने केली. 

Story img Loader