पिंपरी : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडला मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली आहे. आत्तापर्यंत शहरातील पाच जणांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले महामंडळ मिळाले, मात्र शहराच्या ४० वर्षांच्या इतिहासात एकदाही कॅबिनेट, राज्यमंत्रिपद मिळाले नाही. मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेले आणि तीनवेळा निवडून आलेले भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे आणि पिंपरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) अण्णा बनसोडे यांच्या पदरी निराशा पडली आहे.
औद्याेगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील आमदाराला आत्तापर्यंत एकदाही कॅबिनेट अथवा राज्यमंत्रिपद मिळाले नाही. राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेली पदे शहरातील पदाधिकाऱ्यांना मिळाली आहेत. यामध्ये भाजपचे सचिन पटवर्धन यांना सलग दोन वेळा राज्य लाेक लेखा समिती, अमित गाेरखे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, सदाशिव खाडे यांना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद तर राष्ट्रवादीकडून माजी महापाैर आझम पानसरे यांना ग्राहक कल्याण समिती, ज्ञानेश्वर कांबळे यांना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले होते. भोसरीतून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले महेश लांडगे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांचे भावी मंत्री असे फलकही मतदारसंघात झळकले होते. मात्र, त्यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळाले नाही.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयटीनगरी हिंजवडीसह सात गावांचा समावेश का रखडला?
पिंपरीतून राष्ट्रवादीचे अण्णा बनसाेडे हेही तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध आणि बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मंत्रिपद मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागू शकली नाही. मावळातून राष्ट्रवादीचे सुनील शेळके हे दुसऱ्यांदा माेठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांना राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात हाेती. परंतु, त्यांनाही पुढील अडीच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा – ‘भामा आसखेड’चे पाणी मिळणार कधी? पिंपरी – चिंचवडकरांना दररोज पाणीपुरवठ्यासाठी…
महायुतीचे शहरात पाच आमदार
भाजपचे दाेन विधानसभा, दाेन विधान परिषद आणि राष्ट्रवादीचे एक विधानसभा असे महायुतीचे पाच आमदार आहेत. त्यामुळे शहरात महायुतीची ताकद वाढली आहे. आगामी पिंपरी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराला राज्यमंत्रिपद तरी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात हाेता. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.