पिंपरी-चिंचवडमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने त्यांच्या प्रभागातील ट्रॅक्टरभर कचरा मुख्यालयात टाकून आंदोलन केले. या आंदोलनानंतरही पालिकेला जाग आली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा नगरसेवकाने दिला आहे. त्यामुळे भविष्यात कचऱ्याचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा होती. ही पहिलीच सभा कचरा आंदोलनाने गाजली. प्रभाग क्रमांक एकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांनी त्यांच्या प्रभागात साचलेला कचरा ट्रॅक्टरने आणला आणि महापालिकेच्या मुख्यालयातच टाकला. नगरसेवक साने आणि त्यांचे समर्थक याच ट्रॅक्टरमधून आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागातील कचरा उचलला नव्हता. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती साने यांनी व्यक्त केली. साने आणि समर्थकांनी केलेल्या आंदोलनामुळे सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली.

घंटागाडी पंधरा दिवस प्रभागात येत नाही. या ठिकाणचा कचरा उचलला जात नाही. त्यामुळे प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, असे राष्ट्रवादीचे नगरसेवक साने यांनी सांगितले. प्रभागात साचलेल्या कचऱ्यामुळे रोगराई आणि दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. प्रभागातील नागरिक याबाबतच्या तक्रारी माझ्याकडे घेऊन येतात. त्यामुळे आज दुपारी दीडच्या सुमारास प्रभाग एकमधील कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून आणला आणि पालिका मुख्यालयात टाकून आंदोलन केले. आंदोलनामुळे प्रशासनाला जाग आली नाही तर यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक साने यांनी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad pcmc pcmc ncp corporators sane protest threw garbage