पिंपरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) १ ते ९ एप्रिल २०२४ या नऊ दिवसांच्या कालावधीत पाच हजार ५८८ वाहनांची नोंदणी झाली. त्यापोटी ३७ कोटी ४० लाख २६ हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर, सोने आणि वाहनांची खरेदी करणे शुभ मानले जाते. मुहूर्तावर वाहन नेण्यासाठी अनेकांची पसंती असते. त्यामुळे वाहनांची आगाऊ नोंदणी केली जाते. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नऊ दिवसांत साडेपाच हजार वाहनांची नोंदणी झाली. त्यामध्ये सर्वाधिक तीन हजार ४४ दुचाकींची खरेदी झाली. त्याखालोखाल एक हजार ८३५ मोटारींची विक्री झाली. तर, १७५ ई-वाहनांची नागरिकांनी खरेदी केली आहे. यामध्ये १३५ दुचाकी, ३५ मोटारी, पाच इतर वाहनांचा समावेश असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी अतुल आदे यांनी दिली.
हेही वाचा – राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याबाबत अजित पवार काय म्हणाले?
हेही वाचा – मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेतील घटना
दरम्यान, वाहन खरेदीसाठी नागरिकांना वाहन विक्रेत्यांकडून विविध आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. दुचाकीवर हेल्मेट, ॲक्सेसरीज मोफत देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.