पिंपरी- चिंचवड: महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे घुसखोरी करून बांगलादेशी राहत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट देखील त्यांच्याकडून हस्तगत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. पिंपरी- चिंचवड एटीबीने (दहशतवाद विरोधी पथकाने) ४२ घुसखोर बांगलादेशींचे भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात यश मिळवले आहे.
जानेवारी महिन्यात एटीबीला निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच बांगलादेशी राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. निगडी पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केलं होतं. याच दरम्यान, त्यांच्या संपर्कात असलेल्या पासपोर्ट एजंटची देखील चौकशी पोलिसांनी केली. २०१५ पासून तो पासपोर्ट एजंट बांगलादेशीच्या संपर्कात होता. पोलिसांनी माहिती घेऊन आणि मोबाईलच्या आधारे ४२ बांगलादेशींचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट ऑफिस पुणे यांना पिंपरी- चिंचवड एटीबी, परदेशी नागरिक नोंदणी विभाग आणि विशेष शाखा दोन यांच्या मदतीने पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती.
४२ पासपोर्ट हे बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आले होते. हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलपणे हाताळून पुणे पासपोर्ट ऑफिसने ४२ बांगलादेशी घुसखोरांचे भारतीय पासपोर्ट रद्द केले आहेत. या सर्व प्रकियेला सहा महिने लागले आहेत. ही कामगिरी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.