पिंपरी-चिंचवड शहरात पादचारी नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला पिंपरी पोलिसांनी जेरबंद केलं आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला असून विजय दत्तात्रय सरोदे,विजय म्हसू कांबळे आणि किशोर नारायण ढवळे अशी आरोपींची नावे आहेत.त्यांच्याकडून १६ मोबाईल आणि १ दुचाकी असा एकूण १ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज पिंपरी पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हर्षल कालिदास कुंभार याला भरदिवसा पायी चालत जात असताना तिघांनी अंगावर थुंकल्याचा बहाणा करत बेदम मारहाण करत लुटले होते. त्याच्याकडील मोबाइल आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यातील एका आरोपीला नागरिकांनी पकडून चोप देत पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आणखी दोघांची नावे समोर आली. त्यांच्याकडून १६ मोबाइल आणि एक दुचाकी हस्तगत केली असून त्याची किंमत १ लाख ८४ हजार आहे. काही दिवसांपूर्वी याच आरोपीने एका पादचारी नागरिकाला कोयत्याचा धाक दाखवून अज्ञातस्थळी नेवून लुटले होते. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. आरोपी लुटण्यात आलेले मोबाइल ५०० ते १००० रुपयांना विकत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Story img Loader