पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरामध्ये बंद घराची कडी आणि कोयंडा तोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून पसार होणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे शहरातील चंदन नगर, चतुर्श्रुंगी आणि पिंपरी- चिंचवड शहरातील वाकड परिसरात आरोपी सचिन भीमराव पाटील घरफोड्या करायचा. त्याच्याकडून १२ लाख २० हजारांचे वीस तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन भिमराव पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाकड, चतुर्श्रुंगी, आणि चंदन नगर पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तो पिंपरी- चिंचवड आणि पुणे शहरातील विविध परिसरातील घरांची टेहाळणी करून बंद घराची कडी आणि कोयंडा तोडून घरफोडी करत असे. आरोपी सचिन भिमराव पाटील पिंपरी- चिंचवडच्या जगताप डेअरी ब्रीज खाली थांबला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याजवळ घरफोड्या करण्यासाठी लागणारा छोटा रॉड मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवतात त्याने वीस तोळे सोन्याचे दागिने कुठे ठेवले याची माहिती दिली. सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज पोलिसांना जप्त केला.
हेही वाचा… कधी येणार पाऊस, जूनमध्ये किती पडणार पाऊस? हवामान विभागाने वर्तवला अंदाज…
सचिनवर अगोदर पाच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आता तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या टीम ने केली आहे.